नवी दिल्ली - पोर्तुगालने क्रोएशियाचा गुरुवारी रात्री नॅशनल लीगमध्ये २-१ असा पराभव केला. पोर्तुगालच्या विजयात महत्त्वाचे योगदान देणारा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने ९०० वा गोल करून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरला. क्लब आणि देशासाठी खेळताना त्याने कारकिर्दीत ९०० गोलचा टप्पा गाठला. ३९ वर्षांचा रोनाल्डो गोल नोंदवण्याच्या बाबतीत मेस्सीपेक्षा पुढे गेला. रोनाल्डोने ९०० तर मेस्सीने ८३८ गोल केले आहेत.
रोनाल्डोने कारकिर्दीची सुरुवात २००२ मध्ये केली. तेव्हापासून त्याने रियल माद्रिदसाठी ४५८, मँचेस्टर युनायटेडसाठी १४५, जुवेंटससाठी १०१ आणि नस्सरसाठी ६८ गोल केले आहेत. याशिवाय पाच गोल स्पोर्टिंग लिस्बनसाठी केले आहेत.
‘खूप वर्षांपासून मी हे स्वप्न जोपासले होते. ते आता पूर्ण झाले. पण अद्याप काही स्वप्ने शिल्लक आहेत. ९०० गोलची ध्येयपूर्ती हा आयुष्यातील भावनिक माइलस्टोन आहे. माझ्या प्रवासात प्रोत्साहन देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानतो.’- क्रिस्टियानो रोनाल्डो