माद्रिद - जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या शिपरेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०१७-१८ च्या सत्रात रेयाल माद्रिदला विक्रमी सलग तिसरे चॅम्पियन्स लीग जेतेपद पटकावून देण्यात रोनाल्डोने सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत केलेल्या गोलने रेयालचे आव्हान कायम राखले होते आणि त्याच्या याच गोलला चॅम्पियन्स लीगच्या २०१७-१८ मोसमातील सर्वोत्तम गोलचा पुरस्कार मिळाला आहे. रोनाल्डो सध्या युव्हेंटस क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्याने रेयालकडून खेळताना याच क्लबविरुद्ध गोल केला होता. नऊ फूट हवेत झेपावत रोनाल्डोने घेतलेली ती कोलांटीउडी सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर जागा व्यापणारी ठरली. त्या गोललाच ' Goal of the season' चा पुरस्कार मिळाला. कसा केला होता गोल पाहा हा व्हिडीओ... या पुरस्कार निवडीसाठी झालेल्या मतदानात ३४६९१५ मतांपैकी २ लाख मत रोनाल्डोच्या बाजूने पडली. युव्हेंटस क्लबचा सहकारी मारियो मॅंडझूकीचने गत मोसमात रेयाल माद्रिदविरुद्ध अंतिम लढतीत केलेला गोल सर्वोत्तम ठरला होता. रोनाल्डोचा कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी याने २०१४-१५ व २०१५-१६ च्या मोसमात हा पुरस्कार जिंकला आहे. पाचवेळा बॅलोन डी'ओर हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोने ' Goal of the season' साठी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तो म्हणाला,' मला मत देणारे प्रत्येकाचे आभार. तो क्षण मी केव्हाच विसरू शकत नाही. विशेषतः प्रेक्षकांकडून मिळालेली दाद.. '