मुंबई : पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो इंग्लिश प्रीमिअर लीगमधील (ईपीएल) त्याच्या पूर्वाश्रमीच्या क्लबमध्ये परतला. ३६ वर्षीय रोनाल्डोने २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टर युनायटेडसाठी २९२ सामन्यांत ११८ गोल्स केले आहेत. मँचेस्टर युनायटेडने सोशल मीडियावर रोनाल्डोच्या पुनरागमनाची घोषणा केली आणि बघता बघता त्याच्या या पोस्टने जागतिक विक्रम नोंदवला.
रोनाल्डोच्या आगमनाच्या पोस्टला आतापर्यंत १ कोटी २९ लाख ७ हजार २२ लाईक्स मिळाल्या आहेत. एखाद्या क्लबच्या इन्स्टाग्राम पोस्टला मिळालेल्या या सर्वाधिक लाईक्स आहेत. याआधी अर्जेंटिनाचा लिओनल मेस्सीच्या स्वागताची पोस्ट पॅरिस सेंट जर्मेन क्लबने केली होती आणि त्याला ७८ लाख १९ हजार८९ लाईक्स मिळाल्या होत्या.
रोनाल्डोने २०१८ साली ला लिगा क्लब रेयाल माद्रिदसोबतचा ९ वर्षांचा प्रवास संपवून युव्हेंट्सच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्याने तीन वर्षांत इटालियन क्लबकडून १३४ सामन्यांत १०१ गोल्स केले. रेयाल माद्रिदकडून रोनाल्डोने चार चॅम्पियन्स लीग जेतेपद आणि दोन ला लिगा ट्रॉफी जिंकल्या. त्याच्या नावावर ३० मोठ्या स्पर्धांची जेतेपदे आहेत. त्यात पाच चॅम्पियन्स लीग, चार फिफा क्लब वर्ल्ड कप, सात ईपीएल, स्पेन व इटली येथील जेतेपद आणि एक युरो चषक यांचा समावेश आहे.