- अयाझ मेमनएक महिन्याच्या थरारानंतर फ्रान्सच्या रूपाने आपल्याला फिफा विश्वचषकाचा विजेता मिळाला. त्यांनी अंतिम सामन्यात क्रोएशियाचा ४-२ असा पाडाव केला. खेळामध्ये आपल्याला नेहमी असे बघायला मिळते की एक संघ सामना जिंकतो, तर दुसरा संघ सर्वांचे मन जिंकतो आणि क्रोएशियाने नेमकी अशीच कामगिरी केली. त्यांना अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी त्यांची कामगिरी जबरदस्त होती. अंतिम सामन्यात त्यांच्याकडून काही चुकाही झाल्या. तरी फ्रान्सच्या खेळाचेही कौतुक करावे लागेल. फ्रान्सच्या पोग्बा, ग्रीझमन आणि एमबाप्पे या तिन्ही स्टार खेळाडूंनी गोल केले. यामुळे या तिघांचाही भाव चांगलाच उंचावेल. आकडेवारीवर नजर टाकल्यास हा सामना एकतर्फी झाल्याचे दिसत नाही. क्रोएशियाने चेंडूवर ६१% नियंत्रण राखले, तर फ्रान्सने ३९%. पण असे असले तरी चेंडूवर नियंत्रण राखणाराच जिंकतो असे नसते.फ्रान्स फुटबॉलमधील एक महासत्ता आहे हे मान्य करावे लागेल. दुसरीकडे क्रोएशिया त्या तुलनेत खूप लहान देश आहे. या सामन्यात दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनी ज्याप्रकारे सामन्याचा आनंद घेतला ते शानदार होते. तुम्ही देशाचे प्रमुख असाल तरीही क्रीडा स्पर्धांत सहभागी होऊ शकता हे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिले आणि असे झालेही पाहिजे. कारण यामुळे खेळाची प्रगती होईल.दुसरीकडे, क्रिकेटमध्ये भारत-इंग्लंड संघ निर्णायक एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारताला मोठ्या फरकाने नमविले. धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा खेळ पाहून मला काहीसा धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीसारख्या आक्रमक फलंदाजाकडून झालेली संथ खेळी अनपेक्षित होती. इंग्लंडसाठी हुकमी खेळाडू जो रुटने झळकावलेले शतक दिलासादायक आहे. शिवाय तीनशे धावांचा पाठलाग करताना एक वेगळी मानसिक तयारीही करावी लागते. पहिला सामना मोठ्या फरकाने गमावल्यानंतर इंग्लंडने दुसºया सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले.भारतीय गोलंदाजांमध्ये चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने ३ बळी घेतले असले, तरी तो काहीसा महागडा ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद केले असल्याने अजूनही इंग्लंडला कुलदीपची गोलंदाजी समजून घेण्यात अडचण येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लेगस्पिनर युझवेंद्र चहल याने फार बळी घेतले नसले, तरी त्याने धावा रोखण्यात योगदान दिले. वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलच्या अनुभवाची कमतरता दिसून आली. उमेश यादवही महागडा ठरला. त्यामुळे मंगळवारचा निर्णायक सामना जिंकणे दोन्ही संघांना अनिवार्य आहे.
(संपादकीय सल्लागार)