जाकार्ता - इंडोनेशियामध्येफुटबॉल सामन्यादरम्यान मैदानात झालेल्या हिंसाचारादरम्यान, किमान १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सामन्यात एका संघाचा पराभव झाल्यानंतर वादावादी होऊन हाणामारी सुरू झाली. पूर्व जावा येथे एका सामन्यानंतर नाराज झालेल्या समर्थकांनी फुटबॉल स्टेडियममध्ये पोहोचून हल्ला केला. त्यामुळे झालेल्या हिंसाचारात अनेकजण मृत्युमुखी पडले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. स्टेडियममध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या इतरांचा मृत्यू रुग्णालयात झाला.
इंडोनेशियातील बीआरआय लीग-१ मध्ये पर्सेबाया सुराबाया आणि अरेमा एफसी यांच्यात झालेला सामना पर्सेबाया सुराबाया या संघाने ३-२ ने जिंकला होता. त्यानंतर अरेमा एफसीचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी मैदानात घुसून हाणामारी सुरू केली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि इंडोनेशियन राष्ट्रीय सशस्त्र दलाचे मैदानात दाखल झाले. त्यांनी पर्सेबाया सुराबायाच्या खेळाडूंचं संरक्षण केलं.
स्थानिक मीडियातील रिपोर्टनुसार मैदानात सुरक्षा दले आणि फॅन्समध्ये हाणामारी झाली. यादरम्यान, फॅन्सवर सुरक्षा रक्षकांवर हातात मिळेल ती वस्तू फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
पीटी लीगा इंडोनेशिया बारूचे अध्यक्ष अखमद हदियन लुकिता यांनी या घडनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, आम्ही या घडनेमुळे चिंतीत आणि दु:खी आहोत. या घटनेमधून आम्हा सर्वांसाठी एक धडा मिळेल, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.