अबुधाबी : चीन आणि ओमान संघांना अलीकडे आम्ही घाम फोडला. दोन्ही सामने अनिर्णीत राखल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास बळावल्याचे सांगून भारतीय फुटबॉल संघाचा चाणाक्ष कर्णधार सुनील छेत्री याने शनिवारपासून सुरू होत असलेल्या आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाला हरविणे इतके सोपे नसेल, असा इशारा अन्य संघांना दिला.पाच जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीच्या चार शहरात रंगणार आहे. भारताला अ गटात थायलंड, बहरीन, यजमान यूएई यांच्यासोबत स्थान मिळाले. रविवारी भारताचा पहिला सामना थायलंडविरुद्ध होईल. त्यानंतर अबुधाबी येथे यूएईविरुद्ध १० जानेवारीला आणि शारजा येथे बहरीनविरुद्ध १४ जानेवारी रोजी सामना खेळला जाईल. आशियात १५व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने या स्पर्धेच्या तयराीचा भाग म्हणून चीन, ओमान आणि जॉर्डनविरुद्ध सामने खेळले. भारताने चीन आणि ओमानला बरोबरीत रोखले, तर जॉर्डनविरुद्ध सामना १-२ ने गमावला होता.जागतिक फुटबॉलमध्ये भारत ९७व्या, तर चीन ७६ आणि ओमान ८२व्या स्थानावर आहे. जॉर्डन संघ १०९व्या स्थानी आहे.अ.भा. फुटबॉल महासंघाच्या वेबसाईटवर छेत्री म्हणाला, ‘‘मी भारतीयांना आश्वस्त करू इच्छितो, की जे संघ आमच्याविरुद्ध खेळतील त्यांना आमच्यावर विजय मिळविणे सोपे जाणार नाही. आम्ही पराभवाविरुद्ध पेटून उठत असल्याचे अलीकडे सिद्ध झाले. आम्ही योजनेनुसार वाटचाल करीत आहोत.’’ सलग दोन आशियाई स्पर्धांत सहभागी होत असलेला छेत्री एकमेव भारतीय खेळाडू आहे.
भारताला हरविणे सोपे नाही : सुनील छेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 12:49 AM