नवी दिल्ली : क्रोएशियाच्या विश्वचषक संघाचे सदस्य व माजी व्यवस्थापक इगोर स्टिमाक यांची भारतीयफुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती निश्चित आहे. कारण एआयएफएफच्या तांत्रिक सतिमीने गुरुवारी या पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. विश्वचषक १९९८ मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या क्रोएशिया संघाचे सदस्य ५१ वर्षीय स्टिमाक यांची तांत्रिक समितीने निवड केली.तांत्रिक समितीचे अध्यक्ष श्याम थापा यांना सांगितले की, ‘आम्ही चार उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर इगोर स्टिमाक यांचे नाव भारतीयफुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीकडे पाठविले आहे. भारताचे प्रशिक्षकपद भूषविण्यासाठी स्टिमाक आम्हाला सर्वांत उपयुक्त वाटले.’एआयएफएफ शुक्रवारी स्टिमाक यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. स्टिमाक यांना सुरुवातीला तीन वर्षांचा करार राहील. प्रशिक्षक म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ थायलंडमध्ये होणारी किंग्स कप आंतरराष्ट्रीय स्पर्धा राहील. स्टिमाकची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून पहिली लढत कॅरेबियन देश कुराकाओविरुद्ध राहील. (वृत्तसंस्था)मुलाखत प्रक्रियेनंतर तांत्रिक समितीची चार तास बैठक झाली. त्यात सदस्यांनी उमेदवारांबाबत प्रदीर्घ चर्चा केली. मुख्य चर्चा स्टिमाक व रोका यांच्यापैकी कुणा एकाची निवड करण्याबाबत होती. रोका २०१६ ते २०१८ या कालावधीत बेंगळुरू एफसीचे प्रशिक्षक राहिलेले आहेत. स्टिमाक यांना माजी खेळाडू व प्रशिक्षक असल्याचा लाभ मिळाला.