मुंबई : येथे सुरू असलेल्या इंटरकॉन्टीनेंटल कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्यानंतरही यजमान भारतीय संघ आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी विजयाच्या निर्धारानेच उतरेल. याआधी झालेल्या केनियाविरुद्धच्या सामन्यात भारताने ३-० असा दमदार विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरी निश्चित केली होती.चार देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांसाठी मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियम रिकामे राहिल्यानंतर भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने प्रेक्षकांना स्टेडीयममध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. यानंतर केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय प्रेक्षकांनी तुफान गर्दी करत सामना हाउसफुल्ल केला होता. हा छेत्रीचा शंभरावा सामना होता आणि त्याने दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.प्रेक्षकांच्या या तुफान प्रतिसादानंतर बुधवारच्या लढतीची आणि रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचीही सर्व तिकिटे विकली गेल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. सलामीला चिनी तैपईला नमविल्यानंतर भारताने केनियाला पराभूत केले होते. त्यामुळे आता न्यूझीलंडला नमवून विजयी हॅट्ट्रिकसह अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा भारताचा निर्धार आहे.अंतिम फेरी प्रवेश निश्चित असल्याने न्यूझीलंडविरुद्ध भारताचे प्रशिक्षक सुनील छेत्री व बचावपटू संदेश झिंगन यांना विश्रांती देऊन राखीव खेळाडूंना संधी देतात का, हे पाहावे लागेल. केनियाविरुद्ध जोरदार पाऊस पडला होता व हा सामना खूप थकवा आणणाराही होता. छेत्रीला विश्रांती मिळाली, तर बलवंत सिंगला संधी मिळू शकते. तसेच भारताकडे उदांता सिंग, अनिरुद्ध थापा आणि प्रणय हलधर असे आक्रमक मध्यरक्षकही आहेत. (वृत्तसंस्था)जेजे लालपेखलुआ नोंदवणार ‘अर्धशतक’प्रीतम कोलाच्या नेतृत्वामध्ये भारताचा बचावही भक्कम आहे. नारायण दास आणि सुभाशीष बोस यांचा बचाव भेदून गोल करणे न्यूझीलंडच्या आक्रमकांना आव्हानात्मक राहील. तसेच, स्टार जेजे लालपेखलुआ याच्यासाठी हा सामना विशेष ठरणार असून हा त्याच्या कारकिर्दीतील ५०वा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे. भारताकडे गुरप्रीत सिंगच्या रूपाने शानदार गोलरक्षक असून न्यूझीलंडविरुद्ध त्याला विश्रांती दिल्यास युवा विशाल कैथला अंतिम संघात संधी मिळू शकते.अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी न्यूझीलंडला भारताविरुद्ध विजय अनिवार्य आहे. मात्र, भारतीयांचा फॉर्म पाहता त्यांच्यापुढे हे आव्हान खूप कठीण असेल. न्यूझीलंडचे प्रशिक्षक फ्रिट्ज शमिड यांनी म्हटले की, ‘चिनी तैपईविरुद्धचा सामना आम्हाला विसरावा लागेल. यजमानांची कामगिरी पाहिल्यानंतर त्यांचा सामना करणे कठीण होईल.’
विजयी कामगिरी कायम राखण्याचा निर्धार; भारत आज न्यूझीलंडविरुद्ध भिडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:03 AM