लंडन : एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा धुव्वा उडवला. यासह जोकोविचने २०१६ साली फ्रेंच ओपन पटकावल्यानंतर विम्बल्डनच्या रुपाने पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. तसेच जोकोविचचे हे एकूण १३वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.पुरुष एकेरीचे दोन्ही उपांत सामने प्रदीर्घ काळ रंगले. अँडरसन व जोकोविच यांनी आपापल्या मॅरेथॉन लढतीत बाजी मारत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे अंतिम सामनाही अटीतटीचा होईल अशी खात्री टेनिसप्रेमींना होती. मात्र, जोकोविचने आपला सर्व अनुभव पणास लावताना अँडरसनला फरशी संधी न देत ६-२, ६-२, ७-६(७-३) अशी बाजी मारली.पूर्ण वर्चस्व राखलेल्या जोकोने २ तास १९ मिनिटांत बाजी मारली. शनिवारी राफेल नदालविरुद्ध पाच तासांच्या मॅरेथॉन लढतीनंतरही तो ताजातवाना होता. नोवाक जोकोविचच्या धडाक्यापुढे अँडरसन काहीसा दमलेला दिसला. त्याचबरोबर नोवाक जोकोविचने ३३२ गेम्स खेळताना एकाच विम्बल्डन स्पर्धेमध्ये सर्वाधिक गेम खेळण्याचा विक्रमही केला.माईक ब्रायनचे १७ वे ग्रँडस्लॅमजुळा भाऊ बॉब दुखापतग्रस्त झाल्याने माईक ब्रायन विम्बल्डनमध्ये नव्या जोडीदारासह सहभागी झाला. त्याने पुरुष दुहेरीत विक्रमी१७ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. माईक व जॅक सोक या अमेरिकन जोडीने द. आफ्रिकेच्या रावेन क्लासेन व न्यूझीलंडच्या मायकल व्हीनस या जोडीचा संघर्षपूर्ण लढतीत ६-३, ६-७(७), ६-३, ५-७, ७-५ ने पराभव केला.
जोकोविचने उंचावले जेतेपद, एकूण १३वे ग्रँडस्लॅम जिंकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 3:58 AM