नवी दिल्ली- फूटबॉलचे गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताशी असलेले नाते तुम्हाला माहिती असेलच. पण भारतीय फूटबॉल संघाच्या पहिल्या कर्चीणधाराची तुम्हाला माहिती आहे का? आणि तोही ईशान्य भारतातील ... सध्या जगभरात फूटबॉल विश्वचषकाचे वारे वाहात असताना भारतीय संघाच्या या पहिल्या कर्णधाराचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याचे बहुतांश लोकांना माहिती नसेल.
या माणसाचं नाव आहे तालिमेरेन आओ. भारतीय फूटबॉल संघाचे ते पहिले कर्णधार होते. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे ते डॉक्टर होते. त्यांनी टी आओ किंवा ताय आओ म्हटलं जाई तर कधी डॉक्टर ताय म्हटलं जाई. मोहन बागान संघ तसेच भारतीय फूटबॉल संघाची धूरा त्यांच्याकडे देण्यात आली होती. 1948 साली स्वतंत्र भारतातील खेळाडू लंडन आलिम्पिकला गेले तेव्हा तिरंगा हातात घेण्याचा सन्मान त्यांनाच मिळाला होता. 5 फूट 10 इंच उंचीचे डॉक्टर आओ हे एक उत्तम फूटबॉलपटू होते. सलग सहा हंगामांमध्ये ते मोहन बागानचे मिडफिल्डर आणि डिफेन्डर म्हणून त्यांनी एकदम चांगला खेळ केला होता.
1933 साली टी आओ जोरहाट मिशन स्कूलमध्ये शिकायला गेले तेव्हा त्यांना फूटबॉलचे योग्य प्रशिक्षण मिळू लागले. तेथील मुलांबरोबरखेळून ते फूटबॉल उत्तम प्रकारे खेळू लागले. जोरहाटनंतर ते गुवाहाटीला कॉटन महाविद्यालयात गेले. तेथे महाराणा क्लबच्या मुलांबरोबर खेळून त्यांनी फूटबॉलचा आणखी सराव केला. त्यानंतर आसामी क्लबमध्ये ते खेळू लागले.1942 साली त्यांना कार्मायकल वैद्यकीय महाविद्यालय या कोलकात्यातील महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तेथे त्यांचा महाराणा क्लबमधील सरत दास हा मित्र होता. आओ यांना मोहन बागानमध्ये तोच घेऊन गेला. त्यानंतर डॉ. आओ यांची खेळातील प्रगती वेगाने होत गेली.दुसऱ्या महायुद्धामुळे आलिम्पिकमध्ये 14 वर्षांचा खंड पडला होता. 1948 साली लंडन येथे आलिम्पिक आयोजित करण्यात आले होते. त्या ऑलिम्पिक्समध्ये भारताच्या फूटबॉल टीमचे कर्णधार म्हणून डॉ. आओ गेले होते. स्वतंत्र भारताचा ध्वज त्यांनी अभिमानाने आपल्या खांद्यावर घेतला. 1950 साली ते एमबीबीएस झाले.
(डॉ. टी. आओ यांच्या प्रतिमेचे कोहिमा येथे राजभवनात अनावरण करताना नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य)वडिलांच्या इच्छेनुसार डॉ. आओ 1953 साली नागालँडला परतले व कोहिमाच्या सिविल इस्पितळात असिस्टंट सिविल सर्जन म्हणून नोकरीस लागले. तेथेही त्यांची पदोन्नती होत गेली व ते 1978 साली ते नागालँडचे आरोग्यसंचालक म्हणून निवृत्त झाले. नागालँडमध्ये फूटबॉलप्रेम वाढीला लागण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले. 1998 साली वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सन्मानार्थ एक पोस्टाचे तिकीटही भारत सरकारने प्रसिद्ध केले आहे.