कोलकाता : भारतीय फुटबॉल संघाचा बचावपटू संदेश झिंगन याला क्रोएशियाच्या एचएनके सिबेनिक या आघाडीच्या डिव्हिजन क्लबने करारबद्ध केल्यानंतर भारतीय खेळाडूंना त्यांचा खेळ आणखी उंचावेल असा विश्वास आहे. तसेच, जेव्हा झिंगन युरोपियन खेळाचा अनुभव घेऊन मायदेशी परतेल, तेव्हा तो वेगळ्या दर्जाचा खेळाडू बनलेला असेल आणि त्याच्यामुळे आता इतर भारतीय खेळाडूंसाठीही नवे दरवाजे उघडतील, असा विश्वासही भारतीय फुटबॉलपटूंनी व्यक्त केला आहे.
क्रोएशियाची सर्वोच्च लीग असलेल्या पर्वा एचएनएलमध्ये खेळणारा झिंगन पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ठरेल. त्याने काही दिवसांपूर्वीच एटीके मोहन बागानला सोडचिठ्ठी देत एचएनके सिबेनिक क्लबमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. यावर आनंद व्यक्त करताना भारताचा मध्यरक्षक अनिरुद्ध थापा याने म्हटले की, ‘संदेश पाजीला खूप खूप धन्यवाद. भारतीय फुटबॉलसाठी हे मोठे यश आहे. खूप शुभेच्छा. आम्हाला माहीत आहे की, जेव्हा संदेश परतेल, तेव्हा तो वेगळ्या दर्जाचा खेळाडू बनलेला असेल.’ राष्ट्रीय संघातील सर्वच खेळाडूंनी झिंगनला शुभेच्छा दिल्या.
युरोपियन व्यावसायिक लीगसाठी करारबद्ध होणारा झिंगन पहिला भारतीय बचावपटू ठरला. मध्यरक्षक ब्रेंडन फर्नांडिस याने आशा व्यक्त केली की, झिंगनमुळे आता भारतीय खेळाडूंसाठी नव्या संधी चालून येतील. ब्रेंडन म्हणाला की, ‘हा क्षण केवळ भारतीय फुटबॉलसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. ज्यांना युरोपात खेळण्याची इच्छा आहे, अशा सर्व भारतीय खेळाडूंना यामुळे संधी मिळू शकते. झिंगनच्या यशासाठी मी प्रार्थना करेन, तो नक्कीच तिथे चमकेल अशी खात्री आहे.’
एकूण पाचवा भारतीय फुटबॉलपटूयुरोपियन फुटबॉल लिगमध्ये करारबद्ध होणारा झिंगन हा एकूण पाचवा भारतीय फुटबॉल पटू ठरला. झिंगनच्या आधी भारताचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया, सुब्रत पॉल, सुनील छेत्री आणि गुरप्रीत सिंग हेही युरोपियन व्यावसायिक लिगमध्ये करारबद्ध झाले होते. यानंतर असा करार मिळवणारा झिंगन पाचवा भारतीय पुरुष फुटबॉलपटू ठरला.