अबुधाबी : भारतीय फुटबॉल संघाने आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या A गटातील सलामीच्या सामन्यात थायलंडचा 4-1 असा धुव्वा उडवला. आशियाई चषक स्पर्धेत भारताने 55 वर्षानंतर पहिल्या विजयाची चव चाखली. या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने दोन गोल करून अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याचा पराक्रम केला. भारताने 1964 नंतर प्रथमच आशियाई स्पर्धेत विजय मिळवला आहे. छेत्रीने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत पाच गोल केले आहेत. 2011 च्या स्पर्धेत त्याने तीन गोल केले होते आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. थालडंवरील विजयानंतर छेत्रीने भारतीयांना भावनिक साद घातली आहे.
भारतीय संघाच्या विजयात छेत्रीने दोन गोल केले होते, तर अनिरुद्ध थापा आणि जेजे लाल्पेखलूआ यांनी प्रत्येकी एक गोल केला होता. उदांता सिंगनेही गोल करण्यात मोलाचे सहकार्य केले. सामन्यानंतर छेत्री म्हणाला होता की,"खूप आनंद होत आहे. आमच्या गटातील तिन्ही संघांकडे भरपूर अनुभव आहे, पर्यंत आमच्या खेळाडूंनी दर्जेदार खेळ केला. आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा इशारा मी स्पर्धेपूर्वी दिला होता. तंत्रशुद्ध खेळात आम्ही कमी पडू, परंतु विजयाची भूक आणि जिद्द यामुळे आमचे खेळाडू वेगळे ठरतात."
भारताची पुढील लढत संयुक्त अरब अमिराती ( 10 जानेवारी ) आणि बहरिन ( 14 जानेवारी) यांच्याशी होणार आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात छेत्रीने भारतीयांना खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणाला,''आम्ही इथपर्यंत मजल मारू शकलो, ते केवळ तुमच्या पाठिंब्यामुळेच. तुमचे हे प्रेम असेच राहु द्या. संघाला पुढील वाटचालीसाठी त्याची आवश्यकता आहे.''