कोलकाता : फुटबॉलमधील बलाढ्य देश ब्राझील अंडर १७ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आज, बुधवारी इंग्लंडबरोबर दोन हात करील. इंग्लंडचे खेळाडू आत्मविश्वासपूर्ण असून, येथील प्रेक्षकांना रोमांचक खेळाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला जर्मनीवर विजय मिळविताना कष्ट घ्यावे लागले होते. या सामन्यात ब्राझीलला पहिला गोल करण्यासाठी ७० मिनिटे वाट पाहावी लागली होती. वेवरसन व पोलिन्होचे दोन गोल यांच्यामुळे ब्राझीलने विजय मिळविला. मात्र, जर्मनीने पूर्वार्धातच गोल करीत आघाडी घेतली होती.येथील सॉल्टलेक स्टेडियमवर पुन्हा एकदा प्रेक्षकांना ब्राझीलचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. १९९७ मध्ये महान खेळाडू पेले येथे येऊन गेल्यापासून कोलकातावासीय नेहमीच ब्राझीलचे पाठीराखे राहिले आहेत. पावसामुळे गुवाहाटी येथे होणारा सामना रद्द करून तो येथे खेळविला जाणार आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंना गुवाहाटी येथे पोहोचल्यानंतर काही तासांतच पुन्हा कोलकाता येथे यावे लागले. इंग्लंडने येथे तीन साखळी सामने व उपउपांत्य फेरीतील एक सामना खेळला आहे. उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेला ४-१ असे पराभूत केल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू आत्मविश्वासाने सामोरे जातील. त्याचबरोबर त्यांच्या संघात इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळणारे अनेक खेळाडू आहेत.
फुटबॉलमधील बलाढ्य देश ब्राझीलसमोर इंग्लंडचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:34 AM