Euro 2020 स्पर्धेच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध इटली हे दोन संघ भिडणार आहेत. इंग्लंडनं बुधवारी डेन्मार्कचा २-१ असा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. ५५ वर्षांत प्रथमच इंग्लंड मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरला. पण, हा विजय मिळवण्यासाठी त्यांच्याकडून आणि त्यांच्या चाहत्यांकडून रडीचा डाव खेळला गेल्याचे समोर आले आहे.
अतिरिक्त वेळेच्या १०४व्या मिनिटाला इंग्लंडचा कर्णधार हेरी केन यानं केलेला गोल निर्णायक ठरला. १०४व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी किक मिळाली होती तेव्हा प्रेक्षकांमधून डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर शेमेईचेल ( Kasper Schmeichel) याच्या डोळ्यावर लेझर लाईट मारण्यात आली होती. पण, त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही कॅस्परनं तो चेंडू अडवला, पण रिबाऊंडमध्ये केनला गोल करण्यात यश आलं. १९६६च्या वर्ल्ड कप फायनलनंतर इंग्लंडनं मोठ्या स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला.
मात्र, ही पेनल्टी मिळवण्यासाठी रहीम स्टेर्लिंगनंही चिटींग केली. पेनल्टीचा डाव रचण्यासाठी मैदानावर दोन चेंडू ठेवले गेले. स्टेर्लिंगनं बॉक्सजवळ असलेला चेंडू गोलजाळीच्या दिशेनं नेला, पण त्याचशेजारी असलेल्या दुसऱ्या चेंडूमुळे चर्चेला तोंड फुटले आहे.