Euro 2020 semifinal : स्पेनकडून २०१२च्या यूरो स्पर्धेतील फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा इटलीनं बुधवारी काढला. विम्बली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इटलीनं पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन वेळच्या विजेत्या स्पेनचा ४-२( १-१) असा पराभव केला. पहिल्या सत्रात स्पेननं वर्चस्व गाजवताना सर्वाधिक काळ चेंडूवर ताबा ठेवला होता, परंतु त्यांना गोल करण्यात अपयश आलं. इटलीचा बचाव कमकुवत जाणवत होता. मात्र त्याचा फायदा उचलण्यात स्पेनला अपयश आलं.
दुसऱ्या सत्रात फेडेरीको चिएसानं गोल करताना इटलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनचा बरोबरीसाठी संघर्ष सुरू झाला. निर्धारित वेळ संपण्यासाठी १० मिनिटांचा कालावधि शिल्लक असताना स्पेननं स्टार खेळाडू अलव्हारो मोराटाला मैदानावर उतरवले अन् त्यानं बरोबरीचा गोल करून सामन्यातील चुरस वाढवली. अतिरिक्त वेळेतही हिच बरोबरी कायम राहिल्यानं सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. स्पेननं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वित्झर्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्येच विजय मिळवला होता.
२००८च्या यूरो स्पर्धेत स्पेननं इटलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केलं होतं, परंतु यावेळी दानी ओल्मो व मोराटा यांना गोल करण्यात अपयश आलं, तर मॅन्यूएल लोकाटेल्लीनं इटलीसाठीची पहिलीच फ्री किक चुकवली. गोलरक्षक जी डोनारुम्मानंही त्याची कामगिरी चोख बजावली. स्पेनला बरोबरी मिळवून देणारा मोराटोच पेनल्टी शूटआऊटमधील चुकलेल्या फ्री किकमुळे खलनायक ठरला. १९६८नंतर इटलीला युरो चषक जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि डेन्मार्क हे भिडणार आहेत.