मुंबई : फुटबॉल क्लब मुंबईकर्सने शनिवारी रंगलेल्या १८ वर्षांखालील वाय लीग उप-उपांत्यपूर्व फेरी ( महाराष्ट्र विभाग ) स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स संघाविरुद्ध कडवी लढत दिली. पण अखेरच्या क्षणी दोन गोल झाल्याने त्यांनी पराभव पत्करावा लागला. यंग चॅम्प्सने हा सामना 2-0 असा जिंकला. एफसी मुंबईकर्सचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला.
भारताचा माजी कर्णधार स्टीव्हन डायसच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या एफसी मुंबईकर्सने पहिल्या सत्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजविले होते. अनेक वेळा गोल करण्यासाठी आक्रमक चाली रचत मुंबईकर्सने यंग चॅम्प्स संघावर सातत्याने दबाव आणला होता. मात्र अखेरच्या क्षणी मुंबईकर्सचे प्रयत्न तोकडे पडले आणि त्यांना यंग चॅम्प्सकडून पराभव पत्करावा लागला. गेल्या सामन्यात फुटबॉल स्कूल ऑफ इंडियाकडून याच गोलफरकाने एफसी मुंबईकर्सला हार पत्करावी लागली होती. पण या सामन्यात एफसी मुंबईकर्सची कामगिरी उंचावल्याचे दिसून आले.
यंग चॅम्प्स संघाने गुलाब राऊतने ७८व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे संघाने खाते उघडले. त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी एफसी मुंबईकर्सने अतोनात प्रयत्न केले. मात्र यंग चॅम्प्सच्या खेळाडूला अडवण्याच्या नादात मुंबईकरचा मिडफिल्डर प्रत्यक्ष पाठक याच्याकडून चूक झाली आणि यंग चॅम्प्सला फ्री-किक मिळाली. याचा फायदा घेत मोहम्मद नेमिल वालियाट्टील याने गोल करून यंग चॅम्प्सच्या विजयावर २-० असे शिक्कामोर्तब केले.