मॉस्को - फिफाने २०१८ च्या सर्वोत्तम प्रशिक्षकांची नावे जाहीर करताच रेयाल माद्रिदचे झिनेदिन झिदान आणि विश्वविजेत्या फ्रान्सचे डॅडियर डेश्चॅम्प्स यांच्या थेट लढत होणार हे स्पष्ट झाले. पण, त्यानंतर उत्सुकता लागली ती सर्वोत्तम खेळाडूच्या नामांकनाची. अपेक्षेप्रमाणे यात लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी स्थान पटकावले असले तरी त्यांना १९ वर्षीय कायलीन मॅबाप्पेची धास्ती लागली आहे.
मेस्सी आणि रोनाल्डो हे दोन दिग्गज विश्वचषक स्पर्धेत अपयशी ठरले होते. त्यामुळे या चषकावरील त्यांच्या वर्चस्वाला खऱ्या अर्थाने आव्हान निर्माण झाले आहे. फिफाने जाहीर केलेल्या नावांत विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघातील ॲटोइने ग्रिझमन,मॅबाप्पे आणि राफेल व्हॅरने यांचा समावेश आहे. व्हॅरनेने रेयाल माद्रिदसोबत चॅम्पियन्स लीग जिंकली आहे, तर मॅबाप्पेने पॅरिस सेंट-जर्मेनसह फ्रेंच लीग १ जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ग्रिझमनच्या कामगिरीच्या जोरावर ॲटलेटिको माद्रिदने युरोपा लीगमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
इंग्लिश प्रीमियर लीगमधील सर्वोत्तम खेळाडू मोहम्मद सलाहही या शर्यतीत आहे. त्याने लिव्हरपूलचे प्रतिनिधित्व करताना ईपीएलच्या ३६ सामन्यांत ३२ गोल केले आहेत. त्याशिवाय चॅम्पियन्स लीगमध्ये त्याच्या नावावर १० गोल आहेत. बार्सिलोना क्लबच्या मेस्सीच्या नावावर ला लीगा आणि कोपा डेल रेचे जेतेपद आहे. रोनाल्डोच्या नावे चॅम्पियन्स लीगचे जेतेपद आणि सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आहे. पण विश्वचषक स्पर्धेतील अपयश त्यांना महागात पडू शकते.
क्रोएशियाला एतिहासिक भरारी मारण्यात सिन्हाचा वाटा उचलणाऱ्या ल्युका मॉड्रीचलाही नामांकन मिळाले आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत त्याने प्रेरणादायी कामगिरी करताना क्रोएशियाला प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. याच कामगिरीमुळे त्याला गोल्डन बॉलच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. बेल्जियमच्या इडन हॅझार्ड आणि केव्हिन डी बृयने यांच्यासोबत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनही शर्यतीत आहे. ब्राझीलच्या नेयमारला मात्र या यादीत स्थान मिळवण्यात अपयश आले. सर्वोत्तम प्रशिक्षकासाठी कोणात चुरस आहे ते पाहा..