मॉस्को : फुटबॉल विश्वचषकातल्या अखेरच्या सामन्यात पेरुने पहिला विजय मिळवला खरा, पण त्यांचे आव्हान मात्र या लढतीपूर्वीच संपुष्टात आले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पेरुने 2-0 असा दमदार विजय मिळवत विश्वचषकाचा शेवट मात्र गोड केला. पेरुविरुद्धच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले आहे.
ऑस्ट्रेलियासाठी हा सामना महत्त्वाचा होता. कारण हा सामना त्यांनी जिंकला असता आणि जर डेन्मार्कचा संघ फ्रान्सकडून पराभूत झाला असता, तर ऑस्ट्रेलियाला बाद फेरीत पोहोचण्याची संधी निर्माण झाली असती. पण ऑस्ट्रेलियाला या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
पेरु संघाने सामन्याच्या सामन्याच्या 18व्या मिनिटाला गोल लगावला आणि ऑस्ट्रेलियाला पिछाडीवर ढकलले. पेरु संघाच्या आंद्रे कोरिल्लोने संघासाठी पहिल्या सत्रात एकमेव गोल केला. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा गोल करण्यात पेरुला यश आले. पेरुचा कर्णधार पाओलो गुएरेरोने सामन्याच्या 50व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. या गोलच्या जोरावर पेरुने ऑस्ट्रेलियावर 2-0 असा विजय मिळवला.