मॉस्को : फिफा विश्वचषक स्पर्धेसाठीच्या मैदानातील ही एक गोष्ट. ही गोष्ट कुठल्या नामांकित खेळाडूची नाही, कुठल्या संघाची नाही, रशियातील ललनांची नाही, सामन्यातील जय-पराजयातील तर नाहीच नाही. मग तुम्ही विचार करत असाल की, ही गोष्ट नेमकी आहे तरी कसली. ही गोष्ट आहे आपले विचार प्रत्यक्षात उतरवणाऱ्या चाहत्यांची. एखादी चांगली गोष्ट करून लोकांची मने जिंकत त्यांनी आदर्शवाद दाखवून दिला. ही गोष्ट आहे जपानच्या चाहत्यांची आणि त्यांनी मैदानात केलेल्या एका महत्वाच्या कामाची.
जपान आणि कोलंबिया यांची मोर्डोव्हिया एरेना या स्टेडियमवर एक लढत होती. ही लढत कोलंबिया जिंकेल, अशी भाकितं बऱ्याच जणांनी वर्तवली होती. पण हार मानेल ती जपानची टीम कसली. गुणवत्ता, चिकाटी आणि अथक मेहनत करत त्यांनी कोलंबियाला 2-1 असे पराभूत केले. जपानच्या चाहत्यांनी विजयाचा एकच जल्लोश केला. विजयाच्या जल्लोशामध्ये काही जणांचा तोल जातो किंवा त्या उन्मादामध्ये काही जणांच्या हातून अशोभनीय कृत्यही घडतं. पण शेवटी ते नागरीक होते ते जपानचे. महायुद्धात बेचिराख झाल्यानंतरही आपल्या पायावर उभं राहून जगाला आपली दखल घ्यायला लावली ती जपानने. पण हे सारे त्यांना कसे जमले, याचे उत्तर त्यांच्या कृतीतूनंच मिळतं.
सामना संपल्यावर सगळे जपानचे चाहते आपल्या जागेवरच होते. बघता बघता सगळं स्टेडियम रिकामी झालं. जपानच्या प्रेक्षकांनी आपल्याकडील पिशव्या काढल्या आणि अर्ध्या पाऊण तासात सगळं स्टेडियम स्वच्छ केलं ! खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे कागद, टाकलेलं अन्न, सगळं आपापल्या पिशव्यांतून भरलं, आणि एक ठिकाणी गोळा करून ठेवलं.. सगळं स्टेडियम चकचकीत ! नुसतं स्वच्छता अभियान राबवून काहीच होत नाही, तर त्या गोष्टी रक्तात भिनायला लागतात, हे जपानच्या चाहत्यांनी दाखवून दिलं.