बीजिंग : रशियातील फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर आता चांगलाच चढू लागलाय. आता शुक्रवार आणि शनिवारी उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगतील, त्यानंतर विश्वचषकाला गवसणी घालण्यासाठी कोणते चार देश सज्ज असतील, ते आपल्याला समजू शकेल. पण या साऱ्या गोष्टींमध्ये एक वाईट घटना घडली आहे, अन् त्या गोष्टीमुळे फुटबॉल प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.
प्रत्येक विश्वचषकात एखादा प्राणी सामन्यांच्या निकालांबाबत अंदाज व्यक्त करत असतो. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात पॉल ऑक्टोपसने भविष्य वर्तवले होते. सध्या रशियामध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यांचा अंदाज चीनमधील एक मांजर व्यक्त करत होती. आतापर्यंत सहा सामन्यांचे अंदाज या मांजरीने अचूक सांगितले होते. पण काही दिवसांपासून या मांजरीची तब्येत बिघडली होती. पण गुरुवारी मात्र तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.