लंडन - ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनचा एकच संघ सहभागी होत असला तरी फुटबॉल आणि रग्बी या खेळांमध्ये ब्रिटनचे देश एकमेकांविरूद्ध खेळतात. त्यामुळेच रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात यावे यासाठी स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड यांचे चाहते यासाठी देवाचा धावा करत आहेत. इंग्लंडसाठी हा मुद्दा नेहमीच डोकेदुखीचा ठरला आहे. त्यामुळे बुधवारी या देशांमध्ये इंग्लंडच्या विरोधात सुर असेल.
ब्रिटनमध्ये इंग्लंडचाच दबदबा आहे. अनेक खेळांतही त्यांच्या खेळाडूंचा दबदबा प्रकर्शाने जाणवतो. स्कॉटलंडचा माजी विम्बल्डन विजेता अँडी मरेने 2006च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड सोडून अन्य संघांना पाठिंबा असेल असे मत व्यक्त केले होते. यंदाही स्कॉटलंडच्या एका वृत्तपत्राने आम्ही उपांत्य फेरीच्या लढतीत क्रोएशियाला पाठिंबा देणार असल्याचे जाहिर केले आहे. वेल्समध्येही इंग्लंड विरोधी सूर आहे. इंग्लंडच्या प्रत्येक सामन्यात वेल्सचे चाहते प्रतिस्पर्धी संघाचे ध्वज घेऊन बसलेले पाहायला मिळतात.