रोस्तोव ऑन डॉन : उंचीने कमी पण निर्धाराने मजबूत असलेल्या जपानने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमला झगडण्यास भाग पाडले. एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला नेसर चॅडलीने गोल करताना बेल्जियमला 3-2 असा विजय मिळवून दिला.बेल्जियमच्या उंचपुऱ्या आणि तगड्या असलेल्या खेळाडूंना जपानच्या खेळाडूंनी तोडीसतोड उत्तर दिले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात जपानच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात बेल्जियमला गोलशून्य बरोबरीत रोखले. बेल्जियमपेक्षा जपानचा खेळ सरस ठरला. बेल्जियमचे बहुतांशी खेळाडू टॉप लीगमध्ये प्रतिनिधित्व करतात. तरीही त्यांना जपानच्या खेळाडूंनी झुंजवले.मध्यंतराच्या तिस-याच मिनिटाला जपानने उत्तम सम्नवयाचा खेळ करताना 1-0 अशी आघाडी घेतली. गाकू शिबासाकीच्या पासवर गेंकी हारागुचीने मध्यरेषेपासून चेंडूवर ताबा मिळवत बेल्जियमच्या गोलरक्षकाला अचूकपणे चकवले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात जपानकडून बाद फेरीत गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला. बेल्जियमकडून त्याला त्वरीत उत्तर मिळाले असते, परंतु इडन हॅजार्डचा तो प्रयत्न गोलपोस्टला लागून अपयशी ठरला. 52व्या मिनिटाला तकाशी इनुईने जपानच्या खात्यात आणखी भर टाकून बेल्जियमवरील दडपण वाढवले. जॅन व्हेर्टोंझेनने बेल्जियमला पुनरागमनाची संधी मिळवून दिली. व्हेर्टोंझेनने जजमेंट घेत हेडरव्दारे टोलावलेला चेंडू अगदी सहज गोलजाळीत विसावला. 74 व्या मिनिटाला हॅजार्डच्या पासवर मॅरौने फेल्लानीने हेडरव्दारे आणखी एका गोलची भर घातली आणि बेल्जियमने सामना 2-2 असा बरोबरीत आणला. त्यानंतर सामन्यातील चुरस वाढली. बेल्जियमकडून एकामागोमाग एक प्रयत्नांचा सपाटा लावला. जपानच्या खेळाडूंनी आघाडीच्या सोप्या संधी गमावल्या. 86व्या मिनिटाला जपानचा गोलरक्षक इजी कावाशीमाने बेल्जियमचे सलग तीन प्रयत्न सुरेखरित्या अडवले. एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला नेसर चॅडलीने गोल करताना बेल्जियमला 3-2 असा विजय मिळवून दिला.