- सचिन खुटवळकर
गोमंतकीय हे फुटबॉलवेडे म्हणून ओळखले जातात. इथे फुटबॉलची प्रचंड क्रेझ आहे. ब्राझिलचा संघ तर इथल्या फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत. मात्र शनिवारी रात्री बेल्जियमने उपउपांत्य सामन्यात ब्राझिलला २-१ असे पराभूत केले आणि गोमंतकीय फुटबॉलप्रेमींमध्ये शोककळा पसरली.
पणजीतील डॉन बॉस्को विद्यालय संकुलाच्या सभागृहात मोठ्या स्क्रीनवर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे सामने दाखवले जात आहेत. ब्राझिलचा पराभव झाल्यानंतर नेमारचे शेकडो चाहते हिरमुसल्या चेहऱ्याने बाहेर आले. अनेकांनी ब्राझिल संघाच्या जर्सी परिधान केल्या होत्या, तर काहीजणांकडे ब्राझिलचा ध्वजसुद्धा होता. त्यांच्याशी संवाद साधला असता, या पराभवामुळे फिफा विश्वचषक स्पर्धेतील "आमचे" आव्हान संपुष्टात आले आहे. आता विजेतेपद कोणत्याही संघाने जिंकले, तरी आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही, अशा हताश प्रतिक्रिया काही युवकांनी व्यक्त केल्या.
कॉलिन व्हिएगस हा युवक म्हणाला, "आम्ही दरवेळी ब्राझिललाच पाठिंबा देतो. यावेळी नेमार, फिलिप कुतिन्हो, पॉलिन्हो आदी बहुतेक प्रमुख खेळाडू ऐन भरात होते. त्यामुळे ब्राझिल निदान उपांत्य फेरी गाठणार, अशी आम्हाला खात्री होती. परंतु एका स्वयंगोलाने ब्राझिलचा घात केला आणि पाचवेळा विश्वचषक जिंकणारा हा संघ स्पर्धेबाहेर गेला. बेल्जियम हा संघ चांगला असला, तरी ब्राझिलपेक्षा थोड्या कमी क्षमतेचे खेळाडू त्या संघात आहेत. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. मात्र बेल्जियन फुटबॉलपटूंनी जिगरबाज खेळ करून ब्राझीलला चूक सुधारण्याची संधीच दिली नाही."
ब्राझिलच्या पराभवामुळे फेलिक्स रॉड्रिग्ज हा युवक बराच नाराज झालेला दिसला. तो म्हणाला, "शेवटी हा खेळ आहे. कोणता तरी एक संघ जिंकणार होताच. आज ब्राझिलचा दिवस नव्हता. त्यांनी जोरदार प्रयत्न केले; परंतु ते यशस्वी झाले नाहीत. विजेतेपद कोणत्याही संघाने मिळविले, तरी आम्हाला त्याचे अप्रुप नसेल. आमच्यासाठी ही स्पर्धा संपली आहे!"
सामना संपल्यानंतरही फुटबॉलप्रेमींची बराच वेळ चर्चा रंगली होती. ब्राझिलच्या चुकांवर, विशेषतः फर्नांडिनोने केलेल्या स्वयंगोलावर मतमतांतरे व्यक्त होत होती. एकंदरीत, गोमंतकीय फुटबॉलप्रेमींना ब्राझीलचा पराभव जिव्हारी लागला, असेच म्हणावे लागेल.