सचिन खुटवळकर : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे यांच्या बचावात्मक रणनीतीवर टीका होत असली, तरी तेच ब्राझीलच्या प्रशिक्षकपदी राहतील, असे संकेत मिळत आहेत. डुंगा व लुईस फिलिप स्कोलारी यांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर टिटे यांनी ब्राझीलच्या पारंपरिक आक्रमक खेळाला फाटा देत नव्याने संघबांधणी केली. मात्र, अतिबचावाचा परिणाम आघाडीफळीवर झाल्याचे दिसून आल्याने बेल्जियमविरुद्धच्या पराभवानंतर टिटे यांची गच्छंती होईल, अशी अटकळ होती. मात्र, ब्राझील फुटबॉल महासंघ टिटे यांच्या एकूण कामगिरीबाबत समाधानी असल्याने त्यांच्या स्थानाला कोणताही धोका नसल्याचे सध्या तरी दिसते.
वेगवान खेळ व प्रतिस्पर्ध्यांवरील दबावाचे आक्रमक तंत्र ही ब्राझीलची ओळख. मात्र, युरोपियन फुटबॉलची नस ओळखलेल्या टिटे यांनी दोन वर्षांपूर्वी या संघाचा ताबा घेत पारंपरिक रणनीतीला काहीसे दूर सारले व नव्याने व्यूहरचनेची आखणी केली. ब्राझीलचा संघ समतोल बनविण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. दुखापतग्रस्त खेळाडूंचे आव्हान उभे ठाकलेले असतानाही ते डगमगले नाहीत; कारण त्यांनी तितक्याच ताकदीचे पर्यायी खेळाडू तयार ठेवले होते. त्यामुळेच साखळी सामन्यांत नेमारला प्रतिस्पर्धी संघांनी घेरलेले असताना कुतिन्होने अफलातून खेळ केला, तर मार्सेलो दुखापतग्रस्त झाल्यानंतरही बाद फेरीत मेक्सिकोला धोबीपछाड देताना त्याची उणीव जाणवली नाही. मात्र, उपउपांत्य सामन्यात स्वयंगोलाने ब्राझीलला बॅकफूटवर ढकलले व जिगरबाज खेळामुळे बेल्जियमने ही संधी सोडण्याची घोडचूक केली नाही. पहिल्या सत्रात ब्राझीलने बचावात्मक पवित्रा अवलंबल्याचे ठळकपणे दिसून आले. मात्र, पिछाडीवर गेल्यामुळे दुसºया सत्रात टिटे यांनी खेळाडूंना पूर्णपणे मोकळीक दिल्याचे दिसले; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ब्राझीलने केवळ दोन पराभव स्वीकारले आहेत. विश्वचषक स्पर्धेत पाच सामन्यांत केवळ २ गोल करण्याची संधी प्रतिस्पर्धी संघाला दिली. ‘हा खेळ केवळ शारीरिक क्षमतेचा नाही. इथे तुमच्या कौशल्याचा, मानसिकतेचा, तंत्राचा, रणनीतीचा व बुद्धिमत्तेचाही कस लागतो. फक्त कोणता संघ उत्कृष्ट खेळ करतो, यावर त्या सामन्याचे भवितव्य असते. दैव, नशीब वगैरे गोष्टी फिजूल आहेत,’ असे टिटे यांचे मत आहे. ब्राझीलचा गेल्या २0 वर्षांतील सर्वोत्तम संघ अशी सध्याच्या संघाची प्रशंसा केली जाते. त्यामुळेच टिटे यांच्याबाबत महासंघात दुमत नाही.
स्पेनला भोवला प्रशिक्षकाचा वादविश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पेनचे प्रशिक्षक ज्युलन लॉपितेगी यांनी रियल माद्रिद क्लबशी करार केल्याने स्पॅनिश फुटबॉल महासंघाने त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करून फर्नांडो हिरो यांना मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली. या खांदेपालटामुळे संघाच्या मनोधैर्यावर परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले असले, तरी रणनीतीमधील विसंगती स्पेनला भोवल्याचेच दिसून आले. संपूर्ण स्पर्धेत स्पेनला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. बाद फेरीतून रशियाकडून पेनल्टी शूटआउटवर झालेल्या पराभवाबरोबरच स्पेनचे आव्हान समाप्त झाले. आता स्पेनच्या प्रशिक्षकपदाबाबतही वावड्या उठत असून लवकरच नवा प्रशिक्षक नेमला जाईल, असे वृत्त आहे. यात क्विके सांचेझ फ्लोरेस व रॉबर्टो मार्टिनेझ यांची नावे आघाडीवर आहेत. ब्राझीलला हरविणाºया बेल्जियमचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ हे माजी स्पॅनिश फुटबॉलपटू असून त्यांना स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद दिले जाऊ शकते. दरम्यान, साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या जर्मनीचे प्रशिक्षक ज्योकिम लो यांना आणखी काही काळ कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे.