कझन - फिफा विश्वचषकातील आजच्या अखेरच्या सामन्यात कोलंबियाने पोलंडचा पराभव करत पहिला विजय मिळवला आहे. येरी मिना (४०), फाल्को (७०) आणि क्वाड्राडो (७५ व्या मिनिटाला) या त्रिकुटाने नोंदवलेल्या शानदार गोलच्या बळावर कोलंबियाने पोलंडला ३-० ने ‘चारो खाने’ चीत केले. विश्वचषकातील ‘एच’ गटातील या सामन्यात कोलंबिया पोलंडविरुद्ध मध्यंतरापर्यंत एका गोलची आघाडीवर होता. संपूर्ण सामना कोलंबियाने गाजवला.
येरी मीनाने 40 व्या मिनीटाला पहिला गोल करुन कोलबिंयाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 70 व्या मिनीटाला कर्णधार फाल्कोने गोल करत संघाची आघाडी आणखी भक्कम केली. फाल्कोचा विश्वचषकातील पहिला आणि एकूण 30 वा गोल होता. फल्काओनंतर कुआडार्डोने 75 व्या मिनीटाला कोलबिंयासाठी तिसरा गोल करत विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती.
सुरुवातीपासूनच जलद आणि आक्रमक खेळ करणा-या कोलंबियाच्या खेळाडूंकडून पोलंडच्या गोलवर चढाया केल्या. पोलंडच्या आघाडीच्या खेळाडूंनीसुद्धा कोलंबियाविरुद्ध ३ आक्रमणे केली पण त्यांच्या बचाव फळीने ती परतावून लावली. पहिल्या २० मिनिटानंतर कोलंबियाच्या खेळाडूंनी नियोजनबद्ध खेळ करण्यास सुरुवात केली. २७ व्या मिनिटाला कोलंबियाला पुन्हा संधी मिळाली होती. रॉड्रीग्सने फाल्कोकडे पास दिला होता. मात्र पोलंडने शानदार बचाव करीत अडसर निर्माण केला आणि पोलंडची संधी हुकली.
४० व्या मिनिटाला गोलच्या उजव्या बाजूने कोलंबियाचा खेळाडू फाल्फोने आपल्या सहकाºयाकडे शॉर्ट पास दिला. त्या खेळाडूने अलगद किक मारून चेंडू गोलच्या दिशेने मारला. हवेत उडालेल्या चेंडूला गोलजवळ उभ्या असलेल्या येरी मिनाने त्याच जोशात हवेत उडी मारून त्या चेंडूला हेडर मारून पोलंडच्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून गोलजाळीत टाकून आपल्या संघाचा पहिला गोल नोंदविला. आजच्या लढतीसाठी दोन्ही संघाच्या मार्गदर्शकांनी आपापल्या संघात ४ बदल केले होते. मैदानावर ३० हजार कोलंबियन चाहते उपस्थित होते.