मॉस्को - क्रोएशियाने बुधवारी इतिहास घडवताना विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांनी हॉट फेव्हरेट इंग्लंडला २-१ असे पराभूत केले. स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदवण्याची परंपरा त्यांनी उपांत्य फेरीतही कायम राखली. ०-१ अशी पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारली. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार असलेलेल्या प्रत्येकाने विजयी जल्लोष साजरा केला. पण याच विजयी आनंदात क्रोएशियाच्या खेळाडूंकडून असे काहीतरी घडले की त्यांच्यावर माफी मागण्याचा प्रसंग ओढावला. इंग्लंडने पाचव्याच मिनिटाला कायरेन ट्रिपीयरच्या गोलच्या जोरावर आघाडी घेतली. क्रोएशियाने सामन्यात बरोबरी मिळवण्याचे सातत्याने प्रयत्न केले. अखेर ६८ व्या मिनिटाला इव्हान पेरीसिचच्या गोलने त्यांना १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर क्रोएशियाचे आघाडीचे प्रयत्न थोडक्यात हुकले आणि त्यामुळे सामना ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत गेला. त्यातही पहिले सत्र गोलशून्य गेल्याने १-१ अशी कोंडी कायम राहिली. दुसऱ्या हाफमध्ये १०९ व्या मिनिटाला मारिओ मँडझुकिचने अप्रतिम गोल केला आणि क्रोएशियाच्या मँडजुकिचेने प्रेक्षकांच्या दिशेने धाव घेतली. त्यापाठोपाठ इतर सहकारीही आले आणि त्यांनी मँडझुकिच्या अंगावर उड्या मारल्या. त्यात तो प्रसारमाध्यमाच्या फोटोग्राफरवर पडला. सगळा आनंद साजरा केल्यानंतर क्रोएशियाच्या खेळाडूनी त्या फोटोग्राफरची माफी मागितली.