रणजित दळवी : लढा आणि जिंका, नाहीतर घरी जा! आपले भवितव्य आपणच निश्चित करावयाचे हे बाद फेरी गाठणाऱ्यांना काय ठाऊक नाही? अशा स्थितीत विश्वचषक स्पर्धेतील दुसरा अंक सुरू होतो आहे. सुरुवातीलाच फ्रान्सचा अर्जेंटिनाशी मुकाबला व त्यानंतर पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे. याचा अर्थ रोनाल्डो, मेस्सी आणि सुआरेझ हे ‘सुपरस्टार’ आपल्या भूमिका नेमक्या कशा वठवितात याचीच उत्सुकता सर्वांना आहे. हे महारथी त्याचे पूर्ण उत्तर देणार नाहीत, तेव्हा संघ कोणताही जिंको, यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण यावरील वाद - चर्चा चालूच राहील.
या घडीला पहिली लढत फ्रान्सने जिंकावी असा अंदाज वर्तविला जात असताना इतिहास हे सांगतो की, या उभयतांतील डझन लढतींमध्ये अर्जेंटिनाने दहावेळा विजय मिळवला आहे. एक गोष्ट पक्की आहे की फ्रान्सने फारसा गाजावाजा न करता बाद फेरी गाठताना आपले अस्तित्वही दाखवून दिले आहे. तेव्हा अडखळत आगेकूच करणाऱ्या अर्जेंटिनाचा मार्ग खडतर राहील.
फुटबॉल शौकिनांना खरेतर पोर्तुगाल - उरुग्वे लढतीमध्ये अधिक रस असेल. ती अधिक रंगतदार व्हावी, कारण दोन्ही संघ आक्रमक आहेत. तसेच रोनाल्डो आणि सुआरेझ लढतीचे रूप केव्हाही बदलू शकतात. या सुपरस्टार्सव्यतिरिक्त जे आपली छाप पाडू शकतील त्यांत फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लॉरिस, स्ट्रायकर ग्रीझमन, अर्जेंटिनाचे एव्हर बनेगा, मार्कोस रोहो, उरुग्वेचा एडिसन कॅव्हानी आणि पोर्तुगालचे पेपे, विलियम कार्व्हालो आणि क्वारेस्मा.ह्युगो हा सध्या अव्वल गोलरक्षकांपैकी एक असून त्याचे व मेस्सीमधले द्वंद्व पाहण्याजोगे ठरावे. अगदी मेस्सीचा फॉर्म घसरलेला असला तरी. ग्रीझमनही म्हणावा तेवढा चांगला खेळलेला नाही. पण उत्तमोत्तम बचावांना आपल्या वेग आणि शूटिंगच्या कौशल्याच्या बळावर तो निरुत्तर करू शकतो. त्याला रोखण्यासाठी मार्कोस रोहो आणि मंडळ काय योजना आखतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मध्यक्षेत्रात अथक परिश्रम करणाºया एव्हर बानेगाचे चेंडूवरील नियंत्रण वाखाणण्याजोगे आहे. आपल्या अचूक पासेसच्या टायमिंगच्या मदतीने तो बचावफळ्यांना सहज खिंडार पाडू शकतो. त्या दिवशी जसा मेस्सीला दिला तसे दोन - तीन पास तो देऊ शकला, तर सामन्याचा निकाल तो लावू शकतो.
एडिसन कॅव्हानी सुआरेझला किती समर्थ साथ देतो यावर उरुग्वेचा पुढचा प्रवास अवलंबून राहील. तेव्हा या जोडगोळीला निष्प्रभ करण्यासाठी अनुभवी पेपेला आपल्या बचावातील सहकाºयांना सतत चेतवत राहताना मार्गही दाखवावा लागेल. या लढतीत उभय संघांचे मिडफिल्डर्स किती क्रियाशील तसेच कल्पक ठरतात यावर बरेच काही अवलंबून राहील. पोर्तुगालसाठी विलियम कार्व्हालोने आपली उद्यमक्षमता सिद्ध केली आहे. त्या क्षेत्रात नियंत्रण प्रस्थापित करून पासेसची रसद सतत पुरविण्यात तो यशस्वी ठरलेला आहे. त्याने त्याची पुनरावृत्ती केल्यास पारडे पोर्तुगालकडे झुकेल. याशिवाय क्वारेस्माकडे दुर्लक्ष करणे उरुग्वेला परवडणार नाही.फिफाने ‘फेअर प्ले’ म्हणजे खिलाडूवृत्तीला महत्त्व देण्याचे ठरविल्याने सेनेगलपेक्षा कमी पेनल्टी गुणांच्या बळावर जपानला बाद फेरीत प्रवेश मिळाला. याचा अर्थ भविष्यामध्ये आपल्याला किमान साखळीच्या टप्प्यात तरी ‘प्रोफेशनल फाऊल्स’ (हेतुपुरस्सर केलेला नियमबाह्य खेळ) कमी प्रमाणात पाहावयास मिळतील? अशीच काहीशी परिस्थिती बेल्जियम - इंग्लंड लढत बरोबरीत संपली असती तर कदाचित उद्भवली असती.दोन्ही संघांची गुणसंख्या आणि गोलफरक समान असल्याने पेनल्टी पॉइंट्सवर निकाल लावाला लागला असता. पण बेल्जियमने निर्णायक गोल करून जर - तरचा उशिरा का होईना निकाल लावला. त्यांना आता जपानशी दोन हात करावे लागतील, तर इंग्लंडला त्यामानाने अधिक तुल्यबळ कोलंबियाशी मुकाबला करायचा आहे. पण शेवटी त्या दिवशी मैदानात ते काय करतात तेच महत्त्वाचे, निर्णायक!