नवी दिल्ली : रशियामध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर चढायला लागला आहे. या विश्वचषकात बरेच धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत, त्यामुळे या विश्वचषकात कोण बाजी मारणार, हे सध्याच्या घडीला सांगणे सोपे नाही. पण इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमने मात्र हा विश्वचषक कोण जिंकेल, याची भविष्यवाणी केली आहे.
चीनमध्ये फुटबॉल संदर्भात एका कार्यक्रमाला बेकहॅम गेला होता. त्यावेळी बेकहॅमने हा फुटबॉल विश्वचषक कोण जिंकू शकतो, हे सांगितले आहे. बेकहॅमला असे वाटते की, इंग्लंड आणि अर्जेंटीना यांच्यामध्ये या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल. इंग्लंडने पहिल्या सामन्यात ट्युनिशियावर 2-1 असा विजय मिळवला होता, तर अर्जेंटीनाला पहिल्या सामन्यात आईसलँडबरोबर 1-1 अशी बरोबरी स्वीकारावी लागली होती.
विश्वचषकाच्या भाकिताबाबत बेकहॅम म्हणाला की, " इंग्लंडने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. इंग्लंडच्या संघात युवा खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी होत आहे. अर्जेंटीनाला मात्र आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामिगरी करता आलेली नाही. पण या दोन्ही संघांत विश्वचषकाचा अंतिम सामना रंगेल आणि इंग्लंड यावेळी विश्वचषकाला गवसणी घालेल. "