मॉस्को: फिफा वर्ल्ड कप 2018 च्या क गटातील फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क सामना बरोबरीत सुटला आहे. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं असलं तरी दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. फ्रान्सनं सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानं त्यांचा पुढील फेरीतील प्रवेश आधीच निश्चित झाला होता. तर डेन्मार्कनं फ्रान्सला बरोबरीत रोखल्यानं आणि याच गटातील पेरुनं ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानं डेन्मार्कचं पुढील फेरीतील तिकीट नक्की झालं आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि पेरु या दोन्ही संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
लुज्निकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी संथ खेळ केला. त्यामुळे दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. या सामन्यानंतर फ्रान्सचे क गटात 7 गुण झाले. फ्रान्स गटात अव्वल स्थानी असल्यानं त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे डेन्मार्कचे 5 गुण झाले आहेत. त्यामुळे डेन्मार्क गटात दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनाही बाद फेरीचं तिकीट मिळालं आहे. अतिशय बलाढ्य समजल्या जाणाऱ्या फ्रान्सविरुद्ध डेन्मार्कनं दमदार खेळ केला. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या फ्रान्सनं अनेकदा गोल करण्यासाठी आक्रमक प्रयत्न केले. मात्र डेन्मार्कच्या बचावपटूंनी त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. डेन्मार्क या सामन्यात बचावात्मक खेळ केला. त्यामुळे हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. विश्वचषक फुटबॉल सामन्यात पहिल्यांदाच डेन्मार्कनं सामना 0-0 असा बरोबरीत सोडवला आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रात फ्रान्सनं आक्रमक खेळ केला. त्यामुळे डेन्मार्कचा संघ बॅकफूटवर होता. दुसऱ्या सत्रातही फ्रान्सनं अनेकदा गोलपोस्टवर आक्रमणं केली. मात्र डेन्मार्कच्या खेळाडूंनी त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही.