सेंट पिटर्सबर्ग - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्याच्या महत्त्वाच्या असलेल्या लढतीला चार तासांचा कालावधी शिल्लक असताना अचानक त्याचा फोन खणाणतो... समोरचा व्यक्ती जे काही सांगतो ते ऐकल्यावर हातापाय गळून पडतात, डोके सुन्न होते, मनात घालमेल सुरू होते.. कुणाला सांगितले तर अन्य खेळाडूंचे सामन्यावरून लक्ष विचलित होण्याची भिती... पोलिसांना न कळवण्याची धमकी मिळाल्याने तोही पर्याय राहत नाही.. पण असे घडूनही तो मैदानावर उतरतो, अन् माजी विजेत्या अर्जेंटिनाविरूद्ध तो संपूर्ण ९० मिनिटे झोकून खेळतो...
अर्जेंटिनाविरूद्घच्या डी गटातील अखेरच्या साखळी सामन्यापूर्वी नायजेरियाच्या जॉन मायकेल ओबी याच्या वडिलांचे अपहरण झाले होते आणि पोलिसांना सांगितलेस तर वडिलांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. प्रशिकक्षकांना ही घटना सांगावी असे ओबीच्या मनात आले. पण क्षणात तो थांबला या बातमीने सहका-यांवरही मानसिक आघात होईल आणि त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होईल, म्हणून त्याने कोणाला न सांगण्याचा निर्णय घेतला.
26 जूनला झालेल्या या लढतीत नायजेरियाला 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाने नायजेरियाचे आव्हानही संपुष्टात आले. पण, आठ दिवसांनी समोर आलेल्या या घटनेने सर्वांना सुन्न केले आहे. सामन्याच्या चार दिवसांनंतर ओबीच्या वडिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. याआधी 2011 मध्येही ओबीच्या वडिलांचे अपहरण झाले होते.