समारा : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला जे जमलं नाही ते नेमारने आज करून दाखवले. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर नेमारने ब्राझीलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे ब्राझीलला मेक्सिकोवर २-० असा सहज विजय मिळवून फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला.
सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आले नाही. त्यामुळे मध्यंतरानंतर सामना ०-० या बरोबरीत सुरु झाला. पण मध्यंतरानंतर सहाव्या मिनिटालाच नेमारने गोल केला आणि ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. नेमार चेंडू मेक्सिकोच्या गोलजाळ्यापर्यंत घेऊन गेला आणि त्यानंतर विलियनकडे चेंडू सुपूर्द केला. त्यानंतर विलियनने काही क्षणात चेंडू पुन्हा एकदा नेमारकडे दिला. नेमारने कोणतीही चुक न करता यावेळी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
पहिला गोल झाल्यावर ब्राझीलच्या संघाने काही काळ बचावावर भर दिला. सामन्याच्या ८६व्या मिनिटाला राबिर्टो फर्मिनोला खेळायला मैदानात पाचारण केले. त्यानंतर दोन मिनिटांनीच फर्मिनोने गोल केला. नेमारने यावेळी चांगल्या पद्धतीने चेंडू टोलवत तो मेक्सिकोच्या गोलजाळ्यापर्यंत घेऊन गेला. त्यानंतर त्याने फर्मिनोकडे चेंडू सुपूर्द केला. त्यामुळे मैदानात आल्यावर दोन मिनिटांमध्येच फर्मिनोला गोल करता आला.