मॉस्को : आपल्या दुसऱ्या सामन्यात गोलषटकार लगावत इंग्लंडने फुटबॉल विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडने रविवारी झालेल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात पनामा संघावर 6-1 असा दणदणीत विजय मिळवला.
सामन्याच्या आठव्या मिनिटाला स्टोन्सने इंग्लंडसाठी पहिला गोल केला आणि संघाचे खाते उघडले. त्यानंतर सामन्याच्या 22 व्या मिनिटाला इंग्लंडला स्पॉट किक मिळाली आणि केनने या संधीचा चांगला फायदा उचलत संघासाठी दुसरा गोल केला. सामन्याच्या 36व्या मिनिटाला लिंगार्डने इंग्लंडसाठी गोल केला. आठव्या मिनिटाला गोल करणाऱ्या स्टोन्सने सामन्याच्या 40व्या मिनिटाला चमक दाखवली आणि त्याने संघासाठी चौथा गोल करत आपला दबदबा निर्माण केले. निर्धारीत 45 मिनिटानंतर दिलेल्या भरपाई वेळेत इंग्लंडला पुन्हा एकदा स्पॉट किक मिळाली आणि पुन्हा एकदा केनने गोल केला.
दुसऱ्या सत्रात केनच्या नावावर तिसरा गोल जमा झाला आणि या विश्वचषकातील ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली. यापूर्वी पोर्तुगालच्या रोनाल्डोने या विश्वचषकात पहिला गोल केला. पनामाकडून बेलॉयने सामन्याच्या 78व्या मिनिटाला गोल केला. पनामाचा विश्वचषकातील हा पहिला गोल ठरला.