मॉस्को - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली. इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली. दोन्ही संघाकडून तोडीसतोड खेळ झाला. पेनल्टी शूटआऊटमध्येही नाट्याचे सत्र सुरुच राहिले. कोलंबियाच्या गोलरक्षकाने इंग्लंडला बॅकफुटवर टाकले, परंतु आघाडीच्या संधीवर त्यांच्या खेळाडूकडून चुकीचा फटका बसला. त्यानंतर गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला आणि एरीक डायरने त्यावर विजयाचा कळस चढवला. इंग्लंडने 4-3 (1-1) अशी बाजी मारून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांच्यासमोर स्वीडनचे आव्हान असणार आहे.
इंग्लंडला पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवूनही कोलंबियाने गोलशून्य बरोबरीत रोखले. संघाचा प्रमुख खेळाडू जेम्स रॉड्रीगेज दुखापतीमुळे या लढतीला मुकला. त्याही परिस्थितीत कोलंबियाने कौतुकास्पद खेळ केला. 41 व्या मिनिटाला पेनल्टी क्षेत्राबाहेरून मिळालेल्या फ्री किकवर इंग्लंडच्या खेळाडूला अपयश आले. सामन्याच्या सुरुवातीलाच हॅरी केनने हेडरव्दारे गोल करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.