चिन्मय काळे :फुटबॉल विश्वचषकात आजपासून उपांत्य फेरीचे सामने सुरू होत आहेत. २१ विश्वचषकांमधील ८८ वर्षांच्या इतिहासात पाचव्यांदा उपांत्य फेरीतील चारही संघ हे युरोपातील आहेत. विश्वचषकाच्या दोन वर्षे आधी होणारा युरो चषकाला ‘मिनी विश्वचषक’ का म्हणतात, त्याचा प्रयत्य यातून येतो. धनाढ्य क्लब्समुळे फुटबॉल जगतात युरोपातील संघांचा दबदबा असतो. या युरोपियन संघांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘फाइट’ देण्याची ताकद आजवर केवळ दक्षिण अमेरिकन संघांनी दाखवली आहे. पण आधीच्या चार विश्वचषकांप्रमाणे यंदा युरोपियन संघांसमोर दक्षिण अमेरिकन संघ निष्प्रभ झाले. १२ वर्षांनी ही स्थिती निर्माण झाली आहे.
फुटबॉल विश्वचषक ही संकल्पना सर्वात आधी दक्षिण अमेरिकेत उदयास आली. त्यामुळेच पहिली स्पर्धा १९३० साली दक्षिण अमेरिकेतील उरुग्वेमध्ये भरली व तो विश्वचषक उरुग्वेनेच पटकावला. पण त्यानंतरच्या दुसऱ्याच विश्वचषकात झेकोस्लोव्हाकिया व आॅस्ट्रिया या दोन संघांनी अनपेक्षित मुसंडी मारल्याने अंतिम चारही संघ इटली व पश्चिम जर्मनीसह युरोपियन होते. त्यानंतर अशीच स्थिती १९६६ मध्ये निर्माण झाली. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा भरलेली ही स्पर्धा इंग्लंडनेच जिंकली. त्याखेरीज उपांत्य फेरीतील पश्चिम जर्मनी, पोर्तुगाल व सोव्हिएत रशिया हे अन्य तीनही संघ युरोपियन होते. पुढे १९८२ मध्ये युरोपातीलच फ्रान्सच्या भूमित भरलेल्या या स्पर्धेतील इटली, पश्चिम जर्मनी, पोलंड व फ्रान्स हे अंतिम चार संघ युरोपियन होते.
पहिल्या विश्वचषकापासून ते १९९४ पर्यंत स्पर्धेत सुरूवातीला १६ व त्यानंतर २४ संघांना पात्र केले जात होते. पण १९९८ पासून हा आकडा ३२ वर नेण्यात आला. १९९८ पासूनचा विश्वचषक हा ‘मॉडर्न फुटबॉल’ म्हणून नावारुपास आला. या ‘मॉडर्न’ काळातील स्पर्धेत २००६ मध्ये पुन्हा दक्षिण अमेरिकन संघांना उपांत्य फेरीआधी बाहेर पडावे लागले. इटली विरुद्ध फ्रान्स यांच्यातील अंतिम सामन्याखेरीज जर्मनी व पोर्तुगाल असे सर्व युरोपियन संघ त्यावेळी उपांत्य फेरीत होते. त्यानंतर आता फ्रान्स विरुद्ध बेल्जियम व क्रोएशिया विरुद्ध इंग्लंड असे चारही युरोपियन या स्पर्धेत आहेत.
दक्षिण अमेरिका फक्त दोनदा अंतिम फेरीतमागील ६८ वर्षात दोन दक्षिण अमेरिकन संघ अंतिम सामन्यात कधीच आमने-सामने आलेले नाहीत. याआधी असे केवळ दोन वेळा झाले आहे. १९३० मध्ये उरुग्वे विरुद्ध अर्जेंटीना व त्यानंतर १९५० मध्ये उरुग्वे विरुद्ध ब्राझील अशी अंतिम लढत झाली. विशेष म्हणजे त्या दोन्ही लढती उरुग्वेने जिंकल्या होत्या.
१९३० युरोपियन्ससाठी सर्वात वाईट१९३० च्या पहिल्या विश्वचषकात युरोपियन संघांची कामगिरी सर्वात खराब राहीली. त्या स्पर्धेतील अंतिम चार संघांमध्ये युगोस्लाव्हीया हा एकमेव संघ युरोपाचे प्रतिनिधीत्त्व करीत होता. त्यानंतर २०१८ पर्यंत आजवर अशी स्थिती कधीच आली नाही. त्या स्पर्धेत चौथा संघ अमेरिकेचा होता, हे विशेष. याखेरीज दक्षिण कोरियाच्या रुपात आशियाने २००२ मध्ये अंतिम चार संघात स्थान मिळवले. पण २००२ खेरीज एकाही विश्वचषकात आशियन देश उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले नाहीत. आफ्रिकन देश तर एकदाही अंतिम चार संघात राहीलेले नाहीत.