सोची : फिफा विश्वचषकात ग्रुप एफमधील आज झालेल्या साखळी सामन्यात गत विजेत्या जर्मनीने स्वीडनचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. स्वीडनकडून ओला टोइवोनेनने 32 व्या मिनीटाला गोल करत आघाडी घेतली होती. पण जर्मनीने आपला खेळ उंचावत स्वीडनच्या आशेवर पाणी फेरले. चार वेळा फिफा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या जर्मनीकडून मार्को रेयूसने 48 व्या आणि टोनी क्रुसने 90 + 4.42 व्या मिनीटाला गोल केला. या विजयासह जर्मनीच्या राऊंड 16 मध्ये पोहचण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत.
शनिवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये स्वीडनने आक्रमक खेळ करत गतविजेत्या जर्मनीवर आघाडी घेतली होती. आघाडी फळीचा खेळाडू ओला टोईवोनेनने ३२व्या मिनिटाला केलेल्या अफलातून गोलच्या जोरावर स्वीडनने जर्मनीविरुद्ध मध्यंतरापर्यंत १-० गोलने आघाडी घेतली होती. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. पण दोन्ही संघांच्या बचावफळ्या भक्कम असल्यामुळे कोणताही संघ गोल करू शकला नाही. ३२व्या मिनिटाला स्वीडनच्या ओला टोईवोनेने केलेल्या एका चालीवर त्याला सुवर्णसंधी मिळाली. दोन्ही खेळाडूंना चकवत त्याने चेंडू गोलजवळ नेला. तो जवळ आलेला पाहून जर्मनीचा खेळाडू चार पावले पुढे आला. त्याचा फायदा घेऊन ओला टोईवोनेनने चेंडू जर्मनीच्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून अलगद गोलपोस्टमध्ये टाकून आपल्या संघाला १ गोलची आघाडी मिळवून दिली. पण दुसऱ्या हाफमध्ये गतविजेत्या जर्मनीने आपला खेळ उंचावला. सामन्यात शानदार पुनरागमन करत गतविजेत्या जर्मनीने 1-2ने विजय मिळवत राऊंड -16 मध्ये राहण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.