सचिन खुटवळकर- अडखळत सुरुवातीनंतर जर्मनी आणि ब्राझिल हे दिग्गज संघ विजयीपथावर परतल्याने त्यांच्या चाहत्यांनी नि:श्वास टाकला आहे. मेक्सिकोविरुद्ध पहिला सामना गमविल्यानंतर जर्मनीवर पहिल्या गटातच गाशा गुंडाळावा लागण्याची टांगती तलवार होती. मात्र, स्वीडनविरुद्ध विजयाला गवसणी घातल्याने जर्मन गोटातील चिंतेचे सावट आता दूर झाले आहे. दुसरीकडे नेमार, तसेच आघाडी फळीला सूर गवसल्याने ब्राझिलनेही स्पर्धेत मुसंडी मारण्याची नव्याने सज्जता केली आहे.
ज्योकिम लू यांच्या मार्गदर्शनाखाली गत विश्वचषकात विजयी कामगिरी करणारा जर्मनी या वेळी मात्र गलितगात्र झाल्यासारखा खेळत होता. आघाडी फळीचे अपयश ही मोठी चिंता जर्मन पाठीराख्यांना सतावत होती. ओझिल, म्युलर आदी धुरंधरांचे अपयश टीकेचे कारण बनले होते. मात्र, मेक्सिकोविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर खडबडून जागे झालेले जर्मन स्वीडनविरुद्ध तुटून पडले आणि त्यांनी गतविजेत्यांना साजेशा खेळाचे प्रदर्शन केले. आता कोरियाविरुद्ध विजय मिळवून बाद फेरीतील स्थान निश्चित करण्याचा चंग जर्मनीने बांधला आहे.
भारतीयांचा ‘फेव्हरेट’ संघ असलेला ब्राझिल नेहमीच्या जोशात नसल्याने स्पर्धेत विशेष रंगत येत नव्हती. पहिली लढत बरोबरीत सुटल्याने कोस्टारिकाविरुद्ध विजय मिळविण्याच्या जिद्दीने ब्राझिल मैदानात उतरला; परंतु कोस्टारिकाने कोंडी केली. नेयमार, कुतिन्हो या प्रमुख खेळाडूंना पिवळे कार्ड मिळाले. यावरून ब्राझिलने किती धसमुसळा खेळ केला असावा, याचा अंदाज येतो. अर्थात कोस्टारिकाचा प्रतिकार मोडून काढत ब्राझिलने इंज्युरी टाइममध्ये २-० असा विजय मिळविला व आपल्या वेगवान खेळाची चुणूक दाखविली. आता सर्बियाला नमवून बाद फेरीत हल्लाबोल करण्यासाठी ब्राझिल सज्ज झाला आहे.
नवख्या व तुलनेने कमी ताकदीच्या संघांनी अनपेक्षितपणे दिग्गज संघांच्या तोंडचे पाणी पळविल्याने त्यांचे चाहतेही निराश झाले होते. मात्र, स्पेन पाठोपाठ जर्मनी व ब्राझिलला विजयाचा सूर गवसल्याने रंगत आली आहे. अंतिम चार संघांत स्थान मिळविण्यासाठी आता जोरदार रस्सीखेच होईल.