मॉस्को - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर जर्मनीचे खेळाडू निराश चेह-याने मायदेशी परतण्यासाठी गुरूवारी मॉस्कोच्या व्हूनुकोव्हो विमानतऴावर दाखल झाले. यावेऴी प्रशिक्षक ज्योकिम ल्यो यांनी काऴा गॉगल्स घालून दु:ख लपवण्याचा प्रयत्न केला. संघातील अन्य सदस्यही अगदी हतबल झाल्यासारखे विमानतऴावर वावरत होते.
बुधवारी जर्मनीला अखेरच्या साखऴी सामन्य़ात दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागल्यामुऴे स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर ल्यो यांनी जर्मनीच्या चाहत्यांची माफी मागितली. ' या पराभवाचा मलाही तुमच्या इतकाच धक्का बसला आहे. सामन्यापूर्वी खेऴाडूंशी चर्चा करताना ते प्रचंड दबावाखाली असल्याचे मला जाणवले. या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मला थोडा वेऴ लागेल. पण, मी तुम्हा सर्वांची माफी मागतो,' असे ल्यो म्हणाले.
जर्मनी फुटबॉल संघटनेनेही चाहत्यांनी संघाप्रती दाखवलेल्या प्रेमाचे आभार मानले आणि त्यांची माफी मागितली.