- सचिन खुटवळकर
क्रोएशियाने डेन्मार्कला, तर इंग्लंडने कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटवर नमवून उपउपांत्य फेरी गाठली. या पार्श्वभूमीवर अंतिम आठही संघ सजग झाले आहेत. सर्वच संघांकडून तुल्यबळ कामगिरी होत असल्याने पेनल्टी शूटआऊटची शक्यता गृहीत धरून सर्वच संघ जोरदार तयारीला लागले आहेत. पेनल्टी शूटआऊटचा इतिहास पाहिला, तर आतापर्यंत अंतिम सामन्यात दोन वेळा, तर उपांत्य सामन्यात पाच वेळा पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.सुरुवातीला बाद फेरीतील फुटबॉल सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला, तर नाणेफेक करून निर्णय घेतला जात असे. १९७८च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सामन्याचा निकाल ठरविण्यासाठी पहिल्यांदा पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. तेव्हापासून पेनल्टी शूटआऊट हाच अंतिम पर्याय निश्चित झाला. आतापर्यंत २६ विश्वचषक स्पर्धांमध्ये पेनल्टी शूटआऊटने सामन्याचे निकाल ठरविले आहेत. यात अर्जेंटिना सामने जिंकण्यात आघाडीवर आहे. पाचपैकी चार सामने जिंकण्यात अर्जेंटिना यशस्वी ठरला. आतापर्यंत केवळ दोनच सामन्यांत पेनल्टी शूटआऊटनंतरही पुन्हा गोल मारण्याची वेळ आली. या प्रकाराला ‘सडन डेथ’ असे म्हणतात. पेनल्टी शूटआऊटमध्येही बरोबरी झाली, तर प्रत्येक संघाला एकामागोमाग एक असे पेनल्टी गोल मारावे लागतात, ज्याचा गोल हुकेल तो संघ पराभूत होतो.१९९४मधील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घ्यावा लागला. ब्राझील व इटली दरम्यानच्या या सामन्यात अंतिम फटका मारण्यासाठी इटलीचा तत्कालीन स्टार रॉबर्टो बॅजिओ सज्ज झाला. मात्र, ब्राझीलच्या गोलरक्षकाला चकविण्यात तो अपयशी ठरला. अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक झालेला हा रोमांचक सामना ४-३ असा जिंकून ब्राझीलने विश्वविजेतेपद पटकावले होते.
रशियन गोलरक्षकाची कमाल...- रशियाचा गोलरक्षक इगोर अकिनफिव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रशिया १९७0 नंतर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्य फेरीत दाखल झाला असून यामागे अकिनफिवचे श्रम निर्णायक ठरले.- बाद फेरीतील स्पेनविरुद्धच्या सामन्यात रशियाचे पारडे तसे हलकेच होते. अनेक स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या स्पेनकडून रशियाला मात मिळेल आणि स्पर्धेचे आयोजक स्पर्धेबाहेर फेकले जातील, अशी अटकळ अनेकांनी बांधली होती.- प्रत्यक्ष सामन्यात रशियन बचावपटूंनी कमाल केली व निर्धारित वेळेत मातब्बर स्पेनला बरोबरीत रोखले. साहजिकच पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.- स्पेनपेक्षा मानांकनात ६0 स्थानांनी मागे असलेल्या रशियासमोर डेविड दी गिया या अनुभवी गोलरक्षकाचे आव्हान होते. मात्र, रशियन खेळाडूंनी एक अपवाद वगळता ते मोडून काढले.- या सामन्यात हिरो ठरला रशियाचा गोलरक्षक इगोर अकिनफिव. त्याने स्पेनचे दोन गोल अडवून रशियाचा उपउपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. या कामगिरीमुळे त्याच्यावर प्रशंसेचा वर्षाव होत असून ‘फूट आॅफ गॉड’ या विशेषणाने त्याला गौरविण्यात येत आहे.- रशियाचा उपउपांत्य फेरीतील सामना क्रोएशियाशी होणार आहे. विशेष म्हणजे क्रोएशियानेही बाद फेरीत डेन्मार्कवर पेनल्टी शूटआऊटमध्येच मात केली. त्यामुळे या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.