निझनी नोवगोरोड - विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात आक्रमणाचे अस्त्र घेऊनच मैदानावर उतरलेल्या डेन्मार्क आणि क्रोएशिया यांचा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. डेन्मार्कने 120 मिनिटांच्या खेळात 1-1 अशी बरोबरी मिळवून मानसिकरित्या ही लढत जिंकली होती. शूटआऊटमध्ये दोन्ही संघाचा पहिला प्रयत्न गोलरक्षकांना अडवण्यात यश आले. क्रोएशियाने 3-2 (1-1) असा विजय मिळवला. या विजयात गोलरक्षक डॅनिजेल सुबासिच हिरो ठरला.
या संघांनी पहिल्या चार मिनिटांत गोल धडाका लावला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला डेन्मार्कच्या मॅथीयास जॉर्गेनसेन याने गोल केला. विश्वचषक स्पर्धा इतिहासात हा दुसरा जलद गोल ठरला. डेन्मार्कच्या या गोलला क्रोएशियाकडून चौथ्या मिनिटाला प्रत्युत्तर मिळाले. मारियो मँड्झुकीचने गोल करून क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिली. मध्यंतरानंतर डेन्मार्कच्या खेळाडूने उल्लेखनीय खेळ करताना क्रोएशियाचे जबरदस्त आक्रमण अचूकपणे थोपवले. क्रोएशियाचे 6 ऑनटार्गेट प्रयत्न डेन्मार्कच्या गोलरक्षकाने अपयशी ठरवले. अर्जेंटिनाविरूद्ध चमकलेले क्रोएशियाचे ल्युका मॉड्रीच आणि इव्हान रॅकिटीच यांना जखडून ठेवण्यात डेन्मार्कने यश मिळवले.