मॉस्को - कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटवर नमवल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डच्या दिशेने धाव घेतली. विजयाच्या त्यांच्या आनंदापुढे गगनही ठेंगणे वाटत होते. पेनल्टी शूटआऊट आणि इंग्लंड यांचे कधीच पटले नाही. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मागील आठ सामन्यांतील पेनल्टी शूटआऊटमध्ये त्यांचा हा दुसराच विजय होता. त्यामुळे त्याचे महत्व इंग्लंडच्या खेळाडूंच्यापेक्षा दुसरे कुणीच सांगू शकत नव्हते. पण याचवेळी कोलंबियाच्या खेळाडूंच्या मनात किती दु:ख दाटले असेल याची जाण मैदानावर उपस्थित एका व्यक्तीला होती. एकेकाळी ती व्यक्तीही यातून गेली होती. त्यामुळेच विजयाचा आनंद विसरून ती व्यक्ती कोलंबियाच्या खेळाडूंकडे धावली आणि त्यांच्या दु:खावर मायेची फुंकर घातली. कोलंबियाच्या यारी मिनाने अगदी शेवटच्या मिनिटाला गोल करून निर्धारीत वेळेत इंग्लंडला 1-1 असे बरोबरीत रोखले. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतील ती बरोबरीची कोंडी अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळातही न सुटल्याने पेनल्टी शूटआऊटचा खेळवण्यात आली. अन् इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांना 26 जून 1996चा तो दिवस आठवला. युरो चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील लढतीत जर्मनीविरूद्धचा सामना 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्येही 5-5 अशी बरोबरीत सुटली. त्यामुळे सडन डेथमध्ये प्रत्येक गोल महत्वाचा बनला. जर्मनीच्या आंद्रेस मोलरने गोल केला आणि इंग्लंडकडून 26 वर्षीय साऊथगेट पुढे आला. मात्र त्या संधीवर गोल करण्यात अपयशी ठरल्याने इंग्लंडचे आव्हान संपुष्टाल आले. तो प्रसंग आता प्रशिक्षक असलेल्या साऊथगेट यांना मंगळवारच्या पेनल्टी शूटआऊटमध्ये आठवत होता. 1996ला ज्य़ा मनस्थितीतून साऊथगेट यांना जावे लागले होते, आज त्यांच्या जागी कोलंबियाचा मॅटेअस युरीबे होता. निर्णायक पेनल्टीवर त्याला अपयश आले होते आणि तो ढसाढसा रडायला लागला. साऊथगेट यांना त्याच्या वेदना कळल्या आणि ते त्वरीत युरीबेकडे गेले. रडणा-या युरीबेला त्यांनी मिठी मारली आणि त्याला दु:खातून सावरण्यास सांगितले. बहुतेक 96ला इंग्लंडच्या प्रशिक्षक टेरी व्हेनाब्लेस यांनी दिलेला सल्लाच साऊथगेट यांनी युरीबेला दिला असेल. पण, त्यांच्या या कृत्याने फुटबॉलप्रेमींची मनं मात्र जिंकली.
FIFA Football World Cup 2018 : गुरूची 'त्याच्या' दु:खावर मायेची फुंकर...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 7:30 AM
कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटवर नमवल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डच्या दिशेने धाव घेतली. विजयाच्या त्यांच्या आनंदापुढे गगनही ठेंगणे वाटत होते.
ठळक मुद्देबहुतेक 96ला इंग्लंडच्या प्रशिक्षक टेरी व्हेनाब्लेस यांनी दिलेला सल्लाच साऊथगेट यांनी युरीबेला दिला असेल.