मॉस्को : फुटबॉल विश्वचषकात पोर्तुगालचा संघ दिग्गज समजला जात असला तरी इराणसारख्या संघाने त्यांच्या नाकी नऊ आणले. सोमवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात इराणने पोर्तुगालच्या तोडीस तोड खेळ केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे पोर्तुगालचा संघ बाद फेरीसाठी पात्र झाला असून इराणचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.
सामन्याच्या 45 व्या मिनिटाला मात्र पोर्तुगालला गोल करण्यात यश आले. पोर्तुगालच्या रिकार्डोने गोल करत संघाला पहिल्या सत्रात आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात पोर्तुगालपेक्षा इराणने चांगला खेळ केला. रोनाल्डोला या सामन्यातही स्पॉट किक मारण्याची संधी मिळाली, पण यामध्ये तो अपयशी ठरला. त्याचबरोबर इराणच्या एका खेळाडूला पाडल्यामुळे रोनाल्डोला पिवळे कार्डही दाखवण्यात आले.
निर्धारीत वेळेनंतर भरपाई वेळेत पोर्तुगालच्या गोलजाळ्याजवळ त्यांच्याच खेळाडूच्या हाताला चेंडू लागला आणि इराणला स्पॉट किक देण्यात आली. भरपाई वेळेत तिसऱ्या मिनिटाला करिमने ही गोल करण्याची सोपी संधी दडवली नाही. या गोलसह इराणने पोर्तुगालबरोबर सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली.