मॉस्को : सेनेगल आणि जपान यांच्यातील रविवारचा फुटबॉल विश्वचषकातील सामना 2-2 अशा बरोबरीत सुटला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली. दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल करत सामना बरोबरीत सोडवला.
चेंडू जपानच्या गोलपोस्टजवळ होता, तरीही त्यांच्या बचावपटूने चेंडू दूर भिरकावला नाही. त्याची ही चुक सेनेगलच्या पथ्यावर पडली आणि सेनेगलाच्या सादिओ मानेने पहिला गोल केला. त्यानंतर 34 व्या मिनिटाला जपानच्या ताकाशी इनुइने अप्रतिम गोल करत जपानला सामन्यात 1-1 अशी बरोबरी करून दिली.
दुसऱ्या सत्रात मोऊसा वॅगूने 71 मिनिटाला गोल करून सेनेगलला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलचा आनंद सेनेगलला जास्त काळ टिकवता आला नाही. कारण सामन्याच्या 78 व्या मिनिटाला केईसुके होंडाने गोल करत जपानला 2-2 अशी बरोबरी करून दिली. या विजयासह दोन्ही संघ चार गुणांसह ' एच' गटात संयुक्तरीत्या अव्वल स्थानावर आहेत.