- सचिन कोरडे
विश्वचषकाच्या इतिहासात जपान कधीच उपांत्यपूर्व फेरी गाठू शकला नाही. बेल्जियमविरुद्ध त्यांना संधी होती. मात्र बेल्जियमने शेवटच्या २० मिनिटांत जपानीजच्या आशा संपुष्टात आणल्या. सामना जरी बेल्जियमने जिंकला असला तरी सामना पाहणा-या प्रत्येकाची मनं जपाननेच जिंकली. ज्या पद्धतीने त्यांनी टक्कर दिली ती लाजबाबच होती. जपान खेळाडूंमधील शिस्त, खेळाडूवृत्ती आणि स्फूर्ती वाखाण्याजोगी होती. याही पलीकडे त्यांच्यातला एक गुण हेरण्यासारखा आहे. तो म्हणजे त्यांनी दिलेला हृदयस्पर्शी संदेश. सामना संपल्यानंतर जपानच्या खेळाडूंना चेंजिंग रुम स्वच्छ केली आणि आयोजक असलेल्या रशियानांच्या नावे ‘स्पासिबो’ अशी पाटी ठेवली. स्पासिबो हा रशियन शब्द असून त्यांचे भाषांतर धन्यवाद असे होते. पराभूत झाल्यानंतरही जपानी खेळाडूंनी दाखवलेला हा मोठेपणा त्यांच्यातील खेळाडूवृत्तीचे आणि संस्कृतीचे दर्शन देतो. त्यामुळे रशियनची मने जिंकण्यातही ते आघाडीवर राहिले.
या विश्वचषकात जपानच्या पाठीराख्यांनी नवा आदर्श घालून दिला. जपानचा प्रत्येक सामना संपल्यानंतर त्यांचे पाठीराखे स्टेडियमवरील सर्व कचरा उचलायचे आणि स्टेडियम स्वच्छ करायचे. त्यांच्या या उपक्रमाची दखल इतर देशांनीही घेतली. सोशल मिडियावरही त्यांचे कौतुक होत गेले. हा उपक्रम त्यांनी आपला संघ पराभूत झाल्यानंतर कायम ठेवला. संघ पराभूत झाल्याचे शल्य बाजूला ठेवत त्यांनी स्टेडियम स्वच्छ केले. खरोबरच जपानीजच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच. फिफाने सुद्धा त्यांच्या पाठीरांख्यांना धन्यवाद दिले आणि त्यांना ‘बेस्ट सेट्स आॅफ फॅन’ हा पुरस्कारही जाहीर केलाय.