'नेव्हर से डाय' बाण्याच्याकोरियन संघाने जिंकली मने
जर्मनीविरुध्दचा खेळ विसरता न येणारा
ललित झांबरे
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे पहिल्या फेरीचे सामने संपले असून दुसऱ्या फेरीचे १६ संघ स्पष्ट झालेले आहेत. या १६ संघात दक्षिण कोरियन संघ नाही. ते पहिल्या फेरीतच बाद झाले. असे असले तरी त्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात मात्र ज्या नेव्हर से डाय' अॅटीट्युडने बलाढ्य अन् गतविजेत्या जर्मनीला मात दिली...त्या जिद्द आणि लढाऊ बाण्याने त्यांनी जगभरातील रसिकांची मने जिंकून घेतली.
रशिया 2018 च्या गटवार साखळीत भरपूर सामने खेळले गेले पण त्यात सर्वात लक्षात राहतो तो हाच सामना! तो यासाठी की या सामन्याचे दक्षिण कोरियासाठी काहीच महत्त्व नव्हते. जिंकले काय आणि हरले काय, त्यांना घरीच जायचे होते. समोर चार वेळेचा विश्वविजेता जर्मन संघ होता पण म्हणून त्यांनी या सामन्यात केवळ औपचारिकतेचा खेळ केला नाही! ऊलट जिवाची बाजी लावून ते खेळले.
त्यांनी प्रत्येक जर्मन आक्रमणाचा कडवा प्रतिकार केला. प्रत्येक प्रतिहल्ला थोपविण्यासाठी ते जीव तोडून धावले आणि स्वतःला संधी निर्माण करण्यासाठीही धावत राहिले. सामन्याच्या पूर्ण वेळेत यश मिळाले नसले तरी ते हताश झाले नाहीत, प्रयत्न करत राहिले आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.
९० अधिक दुसऱ्या मिनिटाला किम यंग ग्वोन याने आणि ९० अधिक सहाव्या मिनिटाला सन ह्युंग मीन याने गोल केला आणि दक्षिण कोरियाच्या नावावर एका अविश्वसनीय विजयाची नोंद झाली. विश्वविजेत्या संघाला नमवणारे ते पहिले आशियायी ठरले.
जेंव्हा पुढे काही आशा असेल, काही संधी असेल तर विजयासाठी झोकून देणे आपण समजू शकतो पण पुढे काहीच संधी नाही, सारे काही संपले आहे अशा स्थितीतही असा जिद्दीने खेळ या सामन्यात दक्षिण कोरियाकडून बघायला मिळाला म्हणूनच त्यांचा हा विजय इतर विजयांपेक्षा वेगळा ठरतो. या सामन्यात ते कधीही संकटग्रस्त जर्मन संघाच्या उध्दाराच्या मार्गातील एक टप्पा असल्यासारखे वाटले नाही आणि तसे ते खेळलेही नाही. उलट जर्मन्सना पूर्ण वेळ त्यांनी चांगलाच घाम गाळायला लावला.
त्यांचा गोलरक्षक कर्णधार चो ह्यून मून याने स्वतः गोलपोस्टवरचे सहा फटके अडवून संघाला स्फूर्ती दिली. धोकादायक ठरु पाहणारे जर्मन आक्रमण निष्प्रभ ठरविण्यासाठी तो पुन्हा-पुन्हा बॉक्समध्ये झेपावून चेंडू परतावताना दिसला.
अशा खेळाला धाडस लागते आणि ते चो ह्यू वून आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दाखविले म्हणून दक्षिण कोरियाचा हा विजय दीर्घ-प्रदीर्घकाळ लक्षात राहणारा आहे.