स्वदेश घाणेकर
आता नाही तर कधीच नाही... या निर्धाराने लिओनेल मेस्सी रशियात दाखल झाला. पण या निर्धाराबरोबर सोबत तो अपेक्षांचे प्रचंड दडपणही घेऊन आला होता. २०१४ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत जेतेपदाच्या अगदी जवळ जाऊनही अर्जेंटिनाला आलेल्या अपयशाच्या जखमा ताज्या असताना पुढील दोन वर्षे त्याला कोपा अमेरिका स्पर्धेतही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कोपा अमेरिका स्पर्धेत २०१६ मध्ये झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याने लिओनेल मेस्सीने राष्ट्रीय संघ अर्जेंटिनाला सोडचिठ्ठी दिली. पण, चाहत्यांनी केलेल्या विनवणीनंतर हा निर्णय त्याने मागे घेतला आणि पुना राष्ट्रीय सेवेत रुजू झाला..
विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतच बाद होण्याचे संकट संघावर असताना मेस्सीने नेहमी तारणहाराची भूमिका बजावली. यावेळीही अगदी अखेरच्या पात्रता सामन्यात त्याने हॅटट्रिक नोंदवून संघाला रशियाचे तिकीट मिळवून दिले. पण अपयशाची भिती घर करून होतीच. संघाला विश्वचषकात प्रवेश मिळवून दिला खरा, परंतु पुन्हा अपयश आले तर??? हा प्रश्न त्याला सतत त्रस्त करत होता. शरीराने मैदानावर असूनही तो मनाने प्रत्यक्ष सामन्यात जाणवला नाही.
एकीकडे कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोने पहिल्याच लढतीत गोल हॅटट्रिक साजरी केल्यानंतर मेस्सीवरील दडपण अधिक वाढले. त्याची प्रचिती आइसलँड विरूध्दच्या पहिल्या लढतीत आली. पेनल्टी स्पॉट किक आणि फ्री किकवर गोल करण्याची सोपी संधी त्याने गमावली. अर्जेंटिनाचे आव्हान साखळीतच संपुष्टात येणार असे सावट होते. पण सुदैवाने ते दूर झाले आणि संघ बाद फेरीत पोहोचला. पण फ्रान्सविरूध्दच्या लढतीत जे घडले ते मेस्सीलाही अपेक्षित नव्हते.
मेस्सीने आपल्या परीने सर्वस्व पणाला लावले. अर्जेंटिनाच्या दोन गोलमध्ये त्याचे साहाय्य होते. पण तरीही अर्जेंटिनाला पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे ओझे इतके आहे की, मेस्सी निवृत्तीचा विचार करेल. उद्याचा सूर्योदय होण्याआधीच त्याने निवृत्ती जाहीर केलेली असेल. दिएगो मॅराडोना यांच्याशी होत असलेल्या सततच्या तुलनेचा भार आता त्याला खांद्यावरुन खाली फेकावासा वाटत असेल.. नको तो महानपणाचा शिक्का, नको ते जेतेपद, एकट्याने कितीकाळ संघाचे आणि देशवासीयांच्या अपेक्षांचा भार पेलायचा, असे अनेक प्रश्न मेस्सीच्या मनात कालवाकालव करत असतील. पण एका फुटबॉल चाहत्यासाठी तो ग्रेट होता आहे आणि राहिल.. फक्त विश्वचषक न पटकावल्याची खंत मेस्सीच्या आणि त्याच्या पाठिराख्यांना टोचत राहिल. त्यामुळे मेस्सी कदाचित मायदेशात पोहचल्यावर निवृत्तीचा निर्णय घेईल.