कझान - पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि आर्जेंटीनाचा लिओनेल मेस्सी या दोन महान खेळाडूंचे चाहते जगभरात आहेत. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रशियातही त्याची प्रचिती आली. त्यांच्या छायाचित्रांनी कझान मधील भिंती रंगल्या होत्या. पण या दोन्ही खेळाडूंचे आव्हान एकाच दिवशी बाद फेरीत संपुष्टात आले. त्यामुळे त्यांचे छायाचित्र असलेली दिवाळ आता चाहत्यांना काट्यासारखी टोचत आहेत. पण अंतिम चार संघामध्ये अनपेक्षित धडक मारलेल्या संघातील एका खेळाडूच्या प्रेमात ही मंडळी पडलेली पाहायला मिळत आहेत. मेस्सी आणि रोनाल्डोच्या भित्तीचित्राच्या शेजारीच या नव्या खेळाडूचे चित्र रेखाटले जात आहे. क्रोएशियाचा ल्युका मॉड्रिच हा मायदेशात नायक बनला आहेच, परंतु रशियातही त्याने फॅनफॉलोअर्स निर्माण केले आहेत. त्याच्या चेहऱ्याचे छायाचित्र मेस्सीच्या भित्तीचित्राशेजारीच रेखाटले जात आहे. क्रोएशियाला त्याने आपल्या नेतृत्व कौशल्याने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. त्यामुळे त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीला सलाम म्हणून त्याचेही भित्तिचित्रे तयार होत आहेत. मॉड्रीचने विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांत 2 गोल केले आहे, तर एका गोलसाठी साहाय्य केले आहे. त्याने कठीण प्रसंगीही सहका-यांचे मनोबल उंचावण्याचे काम केले आहे. त्याच्या नेतृत्व कौशल्यामुळेच क्रोएशियाने 1998नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान आहे.
FIFA Football World Cup 2018 : मेस्सी-रोनाल्डोनंतर कझानच्या भिंतींवर झळकतोय हा खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 4:23 PM