वोलोगोग्राड : आईसलँडविरुद्धच्या फुटबॉल विश्वचषकाच्या लढतीत नायजेरियाची 'मुसा'गिरी चांगलीच चालली. अहमद मुसाने नायजेरियासाठी गोलचा डबल धमाका लगावला आणि संघाला 2-0 असा दणदणीत विजय मिळवून दिला.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी चांगले आक्रमण केले, पण मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. पहिल्या सत्रात आईसलँडपेक्षा नायजेरियाने आपल्याकडे जास्त वेळ चेंडू ठेवला होता. पण आईसलँडच्या बचावपटूंनी नायजेरियाच्या खेळाडूंना त्यांनी गोल करण्यापासून रोखण्यात यश मिळवले.
पहिल्या सत्रात गोल करता आला नाही म्हणून नायजेरियाचा संघ हताश झाला नाही. दुसऱ्या सत्रात नायजेरियाने जोरदार आक्रमण केले आणि त्याचे फळही त्यांना मिळाले. मध्यंतरानंतर चार मिनिटांनीच नायजेरियाला गोल करण्याची चांगली संधी मिळाली आणि ही संधी त्यांनी दवडली नाही. मोसेझने दिलेल्या पासवर मुसाने 49 मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर मुसाचे आत्मविश्वास दुणावाला. त्यानंतर सामन्याच्या 75 व्या मिनिटाला मुसानेच अप्रतिम गोल लगावला आणि संघासाठी विजयाचे दार उघडून दिले. सामन्याच्या 82व्या मिनिटाला सिगुरड्सनला स्पॉट किक देण्यात आली होती, पण यामध्ये त्याला अपयश आले आणि आईसलँडला पहिला गोल करता आला नाही.