मॉस्को : पनामा रविवारी झालेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यात इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण तरीही त्यांचे खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांना जास्त दु:ख झाले नाही. कारण या सामन्यात पनामाने पराभूत होऊनही इतिहास रचला.
पनामाविरुद्ध इंग्लंडने 62 मिनिटांमध्ये तब्बल सहा गोल केले. त्यावेळी पनामाचे खेळाडू हताश झाले होते. पण त्यानंतर काहीस मिनिटांनी त्यांना आनंद साजरा करण्याची एक संधी मिळाली. पनामाच्या बेलॉयने सामन्याच्या 78व्या मिनिटाला गोल केला आणि स्टेडियम दणाणून गेले. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध गोल लगावला म्हणून ते सारे खूष नव्हते, तर पनामाचा हा विश्वचषकातील हा पहिला गोल ठरला.
आतापर्यंत पनामाला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण विश्वचषकाच्या पात्रता फेरीत पनामाने मातब्बर देशांना धूळ चारली होती, त्यामुळेच त्यांना विश्वचषकाचे तिकीट मिळाले होते. विश्वचषकामध्ये खेळणे, ही गोष्ट पनामासाठी फार मोठी होती. इंग्लंडविरुद्ध त्यांचा बचाव चांगला झाला नाही. पण बेलॉयच्या गोलने मात्र इतिहास रचला.