मॉस्को - फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अव्वल आठ संघ जेतेपदाच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज झाली आहेत. अव्वल किताबासाठीची खरी कसोटी सुरू होत असताना माजी विजेत्या संघाचा प्रमुख खेळाडू जायबंद झाल्याने चमूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे 1950नंतर विश्वचषक जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी उत्सुक असलेल्या उरूग्वेची शुक्रवारी फ्रान्सविरूद्धच्या लढतीत कसोटी लागणार आहे. पोर्तुगालविरूद्धच्या बाद फेरीतील सामन्यात उरूग्वेच्या एडिसन कवानीला दुखापत झाली होती. पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने त्या सामन्यात कवानीला आधार देत मैदानाबाहेर जाण्यास सहकार्य केले होते. त्याच सामन्यात कवानीने दुखापतीपूर्वी दमदार खेळ करत उरूग्वेचा विजय निश्चित केला होता. उरूग्वेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच्या प्रवासात नायक ठरलेला कवानी शुक्रवारच्या लढतीत न खेळण्याची शक्यता बळावली आहे. पोर्तुगालविरूद्धच्या सामन्यात 74 व्या मिनिटाला कवानीच्या पोटरीचे स्नायू ताणले गेले आणि त्याला मैदान सोडावे लागले होते.
फ्रान्सविरूद्धच्या लढतीपूर्वी सराव सत्रात सलग तीन दिवस कवानीने सहभाग घेतला नाही. तो अद्यापही दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे तो उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याजागी संघात ख्रिस्तियन स्तुआनी किंवा ख्रिस्तियन रॉड्रीगेज यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. कवानी दुखापतीतून पुर्णपणे सावरला नसल्याची माहिती उरूग्वे फुटबॉल फेडरेशनने दिली आहे.