मॉस्को - 'एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानोगे रमेशबाबू...' हा बॉलिवूड चित्रपटातील डायलॉग तुम्हाला माहीत आहेच. तशीच, 'तीन जोडी सॉक्स की किमत' आम्ही तुम्हाला विचारली, तर... अर्थातच, प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल, पण तीन जोडी सॉक्स ५० हजार युरोंना पडतील, असं कुणीच सांगणार नाही. परंतु, रशियातील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड संघाला तीन जोडी सॉक्ससाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागली आहे. त्याचं झालं असं की, इंग्लंडच्या डेल अली, एरीक डायर आणि रहिम स्टेर्लिंग यांनी फिफाच्या उपकरण आणि विपणन नियमांचे उल्लंघन केलं. त्यामुळे फुटबॉल असोसिएशनने त्यांना 50 हजार युरोचा दंड ठोठावला. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान त्यांनी नायके या अधिकृत पुरस्कर्ता असलेल्या कंपनीच्या लोगोवर दुसराच सॉक्स घातला. असे करून त्यांनी फिफाच्या आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे फुटबॉल संघटनेला हे पाऊल उचलावे लागले. स्वीडनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंकडून हा प्रकार घडला होता. स्वीडनविरुद्धच्या लढतीपूर्वी आणि प्रत्यक्ष सामन्यात इंग्लंडचे अनेक खेळाडू नियमांचा भंग करताना आढळले, अशी माहिती फिफाने दिली. याआधी स्वीडनच्या काही खेळाडूंना अशाच प्रकारच्या घटनेमुळे दंड भरावा लागला होता. मागील विश्वचषक स्पर्धेत चाहत्यांनी मैदानावर वस्तू फेकल्याने आणि अपशब्द वापरल्याने अर्जेंटिनाच्या संघाला 80 हजार युरोचा दंड भरावा लागला होता.
Fifa Football World Cup 2018: तीन सॉक्सची किंमत £50000; बसला ना धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 5:44 PM